“सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक… उत्तम अभिनय, सोबतीला अनेक दर्जेदार फोटो शूट आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून अक्षया कायम चर्चेत असते. नुकतंच अक्षयाचं दमदार ओटीटी पदार्पण झालं असून टेलीव्हिजनपासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यूपर्यंत पोहोचला आहे.

नेटफ्लिक्सवर नुकत्याच आलेल्या “ग्रेटर कलेश” या चित्रपटातून अक्षयाने तिचं ओटीटी पदार्पण केलंय. या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधीही ठरतेय. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाचं उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने काम केलं आहे.
अक्षयाने या चित्रपटात “पंखुरी” हे पात्र साकारलं असून “ग्रेटर कलेश” हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होतोय. कोणत्याही कलाकाराची बॉलिवूडमध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा असतेच. या निमित्तानं अक्षया या खास प्रोजेक्टचा भाग झाली आणि तिचं बॉलिवुड पदार्पण सुपरहीट ठरलंय.
पहिल्यावहिल्या ओटीटी डेब्यूबद्दल बोलताना अक्षया सांगते, “नेहमी एक पाऊल पुढे टाकायची माझी इच्छा असते. माझ्यासाठी कुठलंच काम छोटं नसतं, पण नेहमी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्याने हा प्रोजेक्ट करण्याची मला संधी आली असं मला वाटतं. कुठल्याही कलाकारासाठी नेटफ्लिक्स हा प्लेटफॉर्म हे खूप मोठा आहे हे कायम वाटत आणि माझा पहिला बॉलिवूड फिल्म डेब्यू इकडे होईल याची कल्पना नव्हती.”

नेटफ्लिक्सवर आल्याबद्दल ती सांगते, “एवढ्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट करायला मिळणं ही संधी खूप खास होती याचा तर आनंद आहे आणि अर्थातच आमची फिल्म सध्या नंबर एकवर ट्रेंड करत असल्यामुळे स्वतःलाच एक मस्त दिवाळी गिफ्ट मिळालं याचा आनंद वाटतोय. मी “टेरिबली टिनी टेल्स” (टीटीटी) यांचा डिजीटल कंटेंट गेली अनेक वर्ष फॉलो करतेय. त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होतीच आणि या फिल्मच्या निमित्ताने तीदेखील पूर्ण झाली. टीटीटी आणि नेटफ्लिक्स या दोन्ही गोष्टी मी मैनिफेस्ट केल्या होत्या. त्या एकत्र आल्या आहेत.”
दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना अक्षया म्हणते, “मी एकमेव अभिनेत्री होते, जी त्यांच्यात नवीन होते. सगळे दिग्गज सहकलाकार एकमेकांना आधीपासून ओळखत होते. त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स एकत्र केलेसुद्धा होते, पण कुठल्याच क्षणी मला मी बाहेरची, आऊटसायडर अभिनेत्री आहे याची जाणीव करून दिली नाही.”
आपल्या भूमिकेबद्दल अक्षया खूपच उत्सुक आहे. याबाबत ती म्हणते, “माझी भूमिका जरी छोटं असलं तरी ती खूप महत्वपूर्ण आहे याचं संपूर्ण श्रेय मी आमचे दिग्दर्शक आदित्य चंडोक आणि लेखक रितू मागो यांना देईन. एका टिपिकल मराठी मुलीकडून त्यांनी एक टिपिकल दिल्ली गर्ल साकारून घेतलीये. एहसास चन्नासोबत सगळेच इतर कलाकार खूप सुंदर काम करतात. मुळात माणूस म्हणूनही सगळे छान होते. चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करताना जेव्हा चांगली माणसं भेटतात तेव्हा त्या प्रोजेक्टच्या यशाचा आनंद हा शब्दात मांडता येत नाही.”

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
