प्रिया बापट, मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र…!

‘आम्ही दोघी’ या चित्रपटानंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत, मात्र यावेळी त्यांची केमिस्ट्री पूर्णपणे वेगळ्या वातावरणात, गूढता आणि थराराने व्यापलेल्या कथेत रंगताना दिसणार आहे. त्यांचा आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘असंभव’ २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून नुकत्याच आलेल्या टीझर आणि पोस्टरमुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटाबद्दल प्रिया बापट म्हणते, ‘आम्ही दोघी’ करताना आम्ही ज्या भावनिक प्रवासातून गेलो, तो अनुभव आमच्यासाठी अत्यंत खास होता. तो जिव्हाळ्याचा बंध प्रेक्षकांनीही अनुभवला. ‘असंभव’मध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत, मात्र यावेळी तोच बंध एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल. मुक्ता सोबत काम करताना नेहमीच एक उत्साह असतो. तिची काम करण्याची पद्धत कमाल आहे. ती त्या भूमिकेत स्वतःला झोकून देते आणि त्यामुळेच समोरचाही तितक्याच उत्साहाने तिच्यासोबत काम करू शकतो. यात आमच्या नात्याची नवी बाजू तर दिसेलच, परंतु त्याचसोबत अनेक प्रश्न आणि आश्चर्याचे क्षणही अनुभवायला मिळतील.

मुक्ता बर्वे या अनुभवाबद्दल सांगते, प्रियासोबत काम करणं नेहमीच एक वेगळा आनंद देणारं असतं. तिच्यासोबत असताना संवाद सहज साधला जातो आणि एकमेकांवरील विश्वास आपोआप वाढतो. ‘आम्ही दोघी’मध्ये आम्ही नात्याची ऊब अनुभवली होती, तर ‘असंभव’मध्ये त्या नात्याभोवती थरार, रहस्य आणि भीतीचं वलय आहे. त्यामुळे काम अधिक रोचक झालं आहे आणि प्रेक्षकांसाठी हा एक नवा व अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी तर सह दिग्दर्शन पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केले आहे. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *