‘आफ्टर ओएलसी’ या चित्रपटाचं पोस्टर समोर आल्यापासून मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा चर्चेत आली. या चित्रपटात शिवानीचा एक वेगळाच नक्षल, डँशिंग, रावडी लूक पाहून साऱ्यांच्या नजरा वळल्या. अर्थातच शिवानी ’आफ्टर ओएलसी’ या चित्रपटातून नेहमीपेक्षा एका वेगळ्याच भूमिकेतून दिसणार आहे. नक्षलवादी वेशात दिसणाऱ्या या लुकसाठी शिवानीने बरीच मेहनत घेतली आहे. इतकंच नाहीतर हा सिनेमा भारतभरात मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कानडी भाषेवरही शिवानीने विशेष मेहनत घेतली.

आपल्या वेगळ्या लुकबाबत शिवानीने म्हणते, “आजवर मी जे सिनेमे केलेत त्यातील भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. त्याहीपेक्षा भूमिकेसाठीचा लुक वेगळा आहे. माझा या चित्रपटात नक्षलवादी लुक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी माझ्या या लुकसाठी मेहनत घेतली आहे. मी बॉडी लँग्वेज आणि हावभावांवरही विशेष लक्ष दिलंय. कानडी भाषा शिकण्यासाठी कर्नाटकला वर्कशॉपमध्येही बरीच मेहनत घेतली. कानडीतील सगळे डायलॉग मराठीत लिहून मग ते पाठांतर करणं हे जणू दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासारखंच होतं. पण हे शिकणं एक गंमत होती असं मी म्हणेन. हा चित्रपट, यांतील भूमिका माझ्या सगळ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप खास आहे. नकारात्मक नाही म्हणू शकणार, पण बंडखोर मताची भूमिका मी आजवर केलेली नाही. त्यामुळे हा वेगळाच अनुभव आहे”.
शिवानीच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, ती चित्रपटात शक्ती ही भूमिका साकारतेय. जी त्या नक्षल ग्रुपची लीडर आहे. बाबांचा वारसा ती पुढे चालवतेय. त्यामुळे तिचे हे पात्र कमांडिंग आहे. आणि ती निर्भीड, बिनधास्त व्यक्तिमत्त्वाची आहे.

चित्रपटातील अॅक्शन सीन्सबाबत शिवानी म्हणाली, “चित्रपटात बरेच अॅक्शन सीन्स आहेत. आणि यासाठी आम्ही सगळेच खूप रिहर्सल करायचो. चित्रपटातील अॅक्शन ही मराठी प्रेक्षकांसाठी एक ट्रीट असणार आहे. ‘केजीएफ’, ‘कांतारा’चे फाईट मास्टर विक्रम मोर यांनीच ‘आफ्टर ओएलसी’च्या अॅक्शन सीन्स डायरेक्ट केले आहेत. त्यांनी अचूक ज्ञान देत मनातील भीती दूर केली. माझ्यासाठी अर्थात हे भीतीदायक होतं, पण विक्रम सरांनी ते अजिबात जाणवू दिलं नाही. ही भूमिका माझ्या आयुष्यातील एक वेगळाच टप्पा ठरेल आणि या चित्रपटामार्फत मी केलेला हा नवा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल”.
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दीपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. 28 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
