स्टार वाइव्जचे वास्तव पडद्यावर येणार

अनेक नॅशनल अवॉर्ड जिंकणारे, सामाजिक वास्तव मांडणाऱ्या धडकदार सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आपल्या आगामी ‘द वाइव्ज’ या चित्रपटाचं शूटिंग अधिकृतपणे पूर्ण केलं आहे. चांदणी बार, पेज 3, फॅशन, हिरॉईन, ट्रॅफिक सिग्नल आणि बबली बाऊंसरसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांना वास्तवाचा आरसा दाखवणारे भांडारकर यावेळीही वेगळ्या विषयासह सज्ज झाले आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, मौनी रॉय, रेजिना कॅसांद्रा, राहुल भट, सौरभ सचदेवा, अर्जन बाजवा आणि फ्रेडी दारुवाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘द वाइव्ज’मधून मधुर भांडारकर पुन्हा एकदा बॉलिवूडच्या झगमगाटाखालचे वास्तव उघड करत आहेत. प्रसिद्धी, सत्ता आणि सार्वजनिक प्रतिमेआड दडलेली भावनिक उलथापालथ, नात्यांमधली गुंतागुंत आणि आतल्या संघर्षांची ही कथा आहे. मानवी नातेसंबंध आणि सामाजिक वास्तवाचं कडू पण प्रामाणिक चित्रण करणारे भांडारकर यावेळीही थरारक, भावनिक आणि आजच्या काळाशी जोडलेली गोष्ट घेऊन येणार आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना मधुर भांडारकर म्हणाले, ‘द वाइव्ज’ ही केवळ स्पॉटलाइटपुरती मर्यादित कथा नाही, तर प्रसिद्धीमुळे झाकोळल्या जाणाऱ्या वैयक्तिक आयुष्याकडे पाहणारी गोष्ट आहे. नाती, महत्त्वाकांक्षा, असुरक्षितता आणि प्रतिमांच्या दुनियेत भावनिक टिकून राहण्याची धडपड या सगळ्यांचा वेध यात घेतला आहे. ही कथा प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने सांगायची होती आणि त्यासाठी माझ्या कलाकार व टीमचे मनापासून आभार.

भांडारकर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणारा ‘द वाइव्ज’ हा ‘इंडिया लॉकडाऊन’नंतर मधुर भांडारकर यांचा दुसरा सिनेमा आहे. समकालीन वास्तवावर आधारित, कंटेंटप्रधान सिनेमा देण्याचा त्यांचा हा प्रयत्न पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवणारा आहे. ‘द वाइव्ज’ची निर्मिती भांडारकर एंटरटेनमेंट यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *