हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आजवर अनेक स्पाय थ्रिलर चित्रपट झालेत. मात्र, मराठी चित्रपटातली स्पाय थ्रिलर चित्रपटांची उणीव आता भरून निघणार आहे. “ट्रायंगल” हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ठरणार असून, अर्जून करे हा नवा चेहरा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

“ट्रायंगल” या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विकी सूर्यवंशी यांनी केलं आहे. राजकीय आणि गुप्तधार्मिक जगतातील गुंतागुंत या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली इंडियन ओशन सिक्युरिटी सिस्टिम डॉक्युमेंट्स चोरी करण्याचा प्रयत्न परदेशी संस्था करतात आणि सुरू होतो एक आंतरराष्ट्रीय खेळ… वेगवान कथा, उत्कृष्ट अॅक्शन सिक्वेन्स हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. तांत्रिक बाजूंवरही हा चित्रपट खिळवून ठेवणारा आहे.
“ट्रायंगल” चित्रपटात अर्जून करे, पूनम कापसे, आरती पुरी, ऋत्विक रास्ते, अलोक बसके, शरद लाडगे, भक्ती साधू अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कुणाल कांबळे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं कथानक मुंबई, गोव्यासह ठिकठिकाणी चित्रीत करण्यात आलं आहे. एक मोठा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे स्पाय थ्रिलर हा प्रकार आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पर्वणी ठरणार आहे. त्याशिवाय उत्तम कथेमुळे प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन या चित्रपटात आहे.

मराठी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न “ट्रायंगल” या पहिल्या स्पाय थ्रिलर चित्रपटातून करण्यात आला आहे. मराठी चित्रपटांची चाकोरी मोडून एक दमदार चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता देशभक्ती, निष्ठा आणि धाडसाची अनोखी गोष्ट या निमित्ताने मराठी भाषेतून पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हायला हवं. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
