रहस्य, कॉमेडीचा भन्नाट तडका

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला, आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या “तुंबाडची मंजुळा” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती, गूढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे.

यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झलक पाहायला मिळते. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं. मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडीत, शार्दूल सराफ यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यातून या गोष्टीची आणि या गावाची अतरंगी झलक आपल्या बघायला मिळते. सोबतीनेच ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गूढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे ? तिच्या गूढतेमागची गोष्ट काय आहे? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो.

दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, ”करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”

रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आता ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *