लग्न, योग्य जोडीदाराचा शोध आणि त्याभोवती घडणाऱ्या मजेशीर घटनांवर आधारित ‘स्वप्नसुंदरी’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेता भूषण प्रधान एका फ्रेश भूमिकेत पाहायला मिळत असून, तो ‘राघव’ची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकत असून, या दोघांची ताजी जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये राघवची मजेशीर झलक पाहायला मिळते. तो लग्नासाठी मुलींना भेटत असतो, मात्र त्याच्या मनात एक अशी ‘स्वप्नसुंदरी’ असते जी त्याच्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर ठरेल. मुली शोधण्याच्या या गंमतीशीर प्रवासात त्याला मानसी भेटते. आता मानसी आणि राघवचे सुत जुळते का? मानसीच राघवची ‘स्वप्नसुंदरी’ आहे का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २४ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणाले, “आजच्या तरुणाईसाठी लग्नाचा निर्णय आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा विषय झाला आहे. हीच गोष्ट आम्ही हलक्या-फुलक्या, विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भूषण प्रधानने ‘राघव’ची भूमिका अतिशय उत्तमरीत्या जिवंत केली असून अनेकांना त्याच्यात स्वतःचा भास होईल. कथा जरी राघवची असली तरी हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंद घेण्यासारखा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”
अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा लग्न, नातेसंबंध आणि योग्य जोडीदाराच्या शोधाभोवती फिरणारा निखळ मनोरंजनप्रधान चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा स्वतः अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी लिहिली आहे. अंकुश बोरडकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. राघवच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण ठरणार आणि त्याच्या लग्नाची गाठ अखेर कशी जुळणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
