पाऊस आला की विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध हे सगळ्यांना लागतात आणि अश्यातच अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाची वारी अजून खास करण्यासाठी सज्ज होताना दिसते. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं आणि आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकूचा एक नवा अंदाज अनुभवायला मिळणार आहे. सारेगम मराठीने सोशल मीडियावर गाण्याची एक छोटी झलक दाखवली आणि आता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. “बाप विठुराया” असं या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाणं बघायला मिळतंय.

गाण्याबद्दल बोलताना रिंकू सांगते, “मला खूप आनंद होतोय की,माझं पहिलं अल्बम गाणं हे विठ्ठलावर चित्रीत आहे. कारण माझं आणि विठ्ठलाच. नातं खूप अगोदरपासूनचं आहे. माझं विठ्ठलावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तो प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत असतो. मी त्याच्याशी खूप गप्पाही मारते. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातल्या एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की, त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलं. कारण आजवर मी कधीच अल्बम साँग केलं नाही. कारण माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे आणि फार वर्षांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करता आलं. सारेगमसोबतही काम करता आलं याचाही मला खूप आनंद आहे.” ११ जुलैला “बाप विठुराया” हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
