कलावंत, क्रिकेटपटू एका व्यासपीठावर

मुंबई : क्रिकेट, मनोरंजन आणि उद्योगविश्वाचा अनोखा संगम असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ (सीटीसी) स्पर्धेची घोषणा आज मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुंबई हिरोजचे कर्णधार सुनील शेट्टी, मुंबई हिरोजचे सोहेल खान, सीटीसीच्या ब्रँड ॲम्बेसेडर दीपाली सय्यद, ब्रँड आयकॉन सिद्धांत मोरे तसेच सीटीसी आणि दिवा टेल्सचे सीएमडी हाफिज बेग हजर होते.

दिवा टेल्स इव्हेंट्स प्रस्तुत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चा मुख्य क्रिकेट सामना ऑक्टोबरमध्ये पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटीज, उद्योजक, व्यावसायिक आणि क्रिकेटप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सीटीसी ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे. यावेळी ग्रॅव्हिटी ग्रुपचे सीएमडी मीहिर कुलकर्णी, “आपली सखी”च्या संचालिका संगीता तर्डे, पुणे टायकून्सचे कर्णधार आणि स्मिता हॉलीडेजचे सीएमडी जयंत गोरे हेही उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला. क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्र आणि उद्योगविश्व यांच्यातील संवाद तसेच परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा सीटीसीचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आता ऑक्टोबरमध्ये पुण्यात होणाऱ्या सीटीसी सामन्याकडे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सेलिब्रिटीजचा जलवा, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाची रंगत यामुळे हा क्रिकेट महोत्सव संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *