गौतमी पाटीलच्या नृत्याने वाढवली उत्सुकता!

मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या आणि नावीन्यपूर्ण विषयांवर आधारित चित्रपटांची नांदी पाहायला मिळत आहे. याच मालिकेत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत असलेला एक बहुचर्चित आणि अनोखा चित्रपट म्हणजे ‘देवघर ऑन रेंट’. हा अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचा संगम असलेला चित्रपट आहे. एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांमधून पोलिसांचा पाठलाग, गुन्हेगारी आणि सूडाची कहाणी उलगडत जाते. या प्रवासात अध्यात्माची भावनिक किनारही कथेला वेगळे वळण देते. उत्कंठावर्धक कथानक असलेल्या या चित्रपटातील ‘अगं आई गं…’ हे धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधतीतच या गाण्याने नेटकऱ्यांचा कौल मिळवला आहे. ‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित ‘देवघर ऑन रेंट’ची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘अगं आई गं…’ हे जल्लोषपूर्ण व ऊर्जावान गाणे संगीतप्रेमींच्या भेटीस आले आहे. हे गाणे अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीत यांच्या सुवर्णमध्य साधणारे एक रंगतदार नृत्यगीत आहे. महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील हिने या गाण्यावर आपल्या ठसकेबाज अदा, मनमोहक हावभाव आणि लयबद्ध ठेक्यांनी चारचांद लावले आहेत. तिचा हा दिलखेचक अंदाज, सोबत असणाऱ्या सहकलाकारांची धमाल आणि सळसळत्या उत्साहाने भारलेली रंगीबेरंगी वातावरणनिर्मिती यामुळे हे गाणे लक्षवेधी बनले आहे. लेखक-गीतकार संजय नवगिरे यांनी अत्यंत अर्थपूर्ण व श्रवणीय शब्दांत हे गाणे गुंफले असून, संगीतकार कबीर शाक्य यांच्या कर्णमधुर व ताल धरायला लावणाऱ्या संगीताने गाण्यात प्राण फुंकले आहेत. तर पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी आपल्या दमदार आणि नखरेल आवाजात हे गीत गाऊन रसिकांची मने जिंकली आहेत.

‘देवघर ऑन रेंट’मध्ये निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका असून ‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधूर स्वरसाज चढवला असून, कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. डिओपी चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केले आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी घेतली आहे. कला दिग्दर्शनाचे काम दिलीप कंधारे यांनी पाहिले आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी, तर रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *