‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’, ‘डावपेच’ आणि ‘कौल मनाचा’, ‘तारिणी’ अशा विविध कलाकृतींमधून आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भीमराव मुडे आता ‘प्रेमायण’ या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडणारे भिमराव मुडे यावेळी प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर ‘प्रेमायण’ ही वेबसीरिज १६ ऑक्टोबर पासून प्रदर्शित झाली आहे.

‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भीमराव मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील ‘प्रेमायण’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या वेबसिरीजचे ते क्रिएटर असून, राजेश पाठक (कंटेंट हेड स्टेज मराठी) यांच्या कथेला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्या संकल्पनेची जोड लाभली आहे. आरा मल्टिमीडिया निर्मित या वेबसीरिजचे दिग्दर्शन राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव, मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू यांची प्रभावी गुंफण करत ‘प्रेमायण’मधून प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाचे अनोखे कथाविश्व उलगडणार आहे.

नात्यामागची एक वेगळी बाजू आणि प्रत्येक निर्णयामागची एक वेगळी कहाणी ‘प्रेमायण’मधून उलगडणार आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ गुंतवून ठेवणार नाही, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडेल, असा विश्वास भीमराव मुडे यांनी व्यक्त केला. ‘प्रेमायण’ या सीरिजमध्ये हार्दिक जोशी, अभिनव कुरणे, प्रतीक्षा पोकळे, ओमप्रकाश शिंदे, उमेश जगताप, शुभांगी भुजबळ, पल्लवी ओंकार आणि विनोद लव्हेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले कथानक यांमुळे या सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
