पुण्याच्या पार्श्र्वभूमीवर उलगडत जाणारी उमा भालेराव आणि तिचा मुलगा निनाद यांची अगदी छोटीसी, साधी, सोप्पी आणि तितक्याच साधेपणाने मांडलेली गोष्ट मनाला चटका लावून जाते. मायाळू आई आणि तिच्या एकुलत्या एक लेकाची दृश्य लघुकथा “उत्तर” या सिनेमात मांडण्यात आली आहे. अवघ्या चार मुख्य पात्रातून साकारत जाणारी आणि चित्रपटाचा देखणेपणा ही सिनेमाची दुसरी जमेची बाजू म्हणता येईल.
कुटुंबसंस्थेत आई वडील मुलांसाठी पूरक असतात. त्यात आईचे नाते तर मुलांसाठी अधिक मायाळू असते. त्यात एकल पालकत्व असलेल्या आई किंवा वडिलांकडून मूल किंवा मुले वाढवताना विशेष काळजी घेतली जाते. मुलांना काही कमी पडू नये हा त्यामागचा मुख्य उद्देश असला तरी त्याचे संगोपन करताना त्याला आईची किंवा वडिलांची कमतरता भासू नये, त्याच्या बाल मनावर विपरित परिणाम होऊ नये तसेच विश्वासाला आणि आत्मविश्वासाला कुठे तडा जाऊ नये, म्हणून काळजी घेतली जाते.
‘उत्तर’मध्ये अशाच मायाळू आई आणि तिच्या एकुलत्या एक लेकाची कथा शहरी जीवनातली रुक्षता सोबत घेऊन मांडली गेली आहे. पुणे शहराच्या पार्श्र्वभूमीवर उमा भालेराव आणि तिचा मुलगा निनाद यांची अगदी छोटीसी, साधी, सोप्पी आणि तितक्याच साधेपणाने मांडलेली गोष्ट मनाला चटका लावून जाते.
वडील लहानपणीच गेल्यानंतर आईने अगदी लाडात वाढवलेल्या पण परिस्थितीची नीट जाणीव करून दिलेल्या समजूतदार आईचा तितकाच समजूतदार मुलगा अशा दोघांचे विश्व रोजच्या जगण्यातून दिग्दर्शक उलगडत नेतो. पण आईला एक दिवशी अचानक कळते की, आता तिच्याकडे काही महिनेच आयुष्य शिल्लक आहे. मायाळू वाटणारी गोष्ट कारुण्य आणि सहानुभूतीच्या वाटेने पुढे सुरू राहते.

बालपणापासून घरची आणि बाहेरची काम करत अकाली प्रौढ झालेला निनादला व्यवहारात कधी कोणाशी कसे वागावे, याची पुरेपूर कल्पना असलेल्या, भावनिक वाटणाऱ्या नात्यांची व्यवहारी बाजू तो त्याच्या प्रेयसीला एखाद्या अनेक पावसाळे पाहिलेल्या व्यवहारी माणसासारखा चपखलपणे मांडून तिची भावनिक बाजू नेहमीच खोडून काढत असतो. माणसे एकमेकांचा आधार स्वार्थासाठी, आपापल्या सोयीसाठी घेतात. तो स्वार्थ पूर्ण झाला की, ज्याची मदत घेतली त्याला विसरून जातात, हे तत्त्वज्ञान तो प्रेयसीच्या गळी वारंवार उतरवतो.
मात्र, निनाद आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतात, हे तो स्वीकारू शकत नाही. आईवर प्रेम करणाऱ्या, आईशी लग्न करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आईला स्पर्श करताना आणि आईने त्या व्यक्तीला स्पर्श करताना बघून त्याच्या बालमनावर परिणाम होतो तो त्याला काही केल्या काढून टाकता येत नाही. सदा सर्वकाळ समजूतदारपणे वागणारा निनाद या बाबतीत कच्चा राहतो. भावनिक आणि लैंगिक किनार असलेल्या नात्याबद्दल त्याच्या मनात अढी निर्माण होते आणि हीच अढी त्याच्या प्रेयसीच्या नात्यात अडथळा निर्माण करते. सगळ्या गोष्टी अगदी सहज स्वीकारणारा, मोठ्या माणसासारखा विचार करणारा निनाद प्रेयसीच्या भावनिक आणि लैंगिक स्पर्शाला घाबरतो.
जगण्यासाठी आपल्याकडे चार महिनेच आहेत याचे दुःख आणि त्याचवेळी अचानक मृत्यू होणाऱ्यांच्या नशिबात तेही नसते, याचे समाधान डॉक्टरांसमोर मांडताना रेणुका शहाणे यांनी साकारलेली एक सबळ, पण हताश आई डोळ्यात पाणी आणते. सगळ्यांच्या आई सारख्याच प्रेमळ असतात पण अकाली पती आणि त्यानंतर निवृत्तीला काही काळच शिल्लक राहिलेला असताना मुलाला वेळ देऊ इच्छितानाच काळ आपल्याला मुलापासून अचानक हिरावून घेणार आहे, याची वेदना, दुःख आणि त्यातून निर्माण होणारी घालमेल रेणुका यांनी त्यानंतर प्रत्येक प्रसंगात दाखवून दिली आहे. रेणुका शहाणे यांनी साकारलेली उमा भालेराव उत्तम, पण त्यांचे मुलाबरोबरचे सर्व संवाद कोरडे आणि कृत्रिम वाटतात. त्यांचा अभिनय उत्तम आणि पण संवाद रोज घरात बोलताना आई आणि मुलाच्या तोंडचे वाटत नाहीत. मात्र, इतरांशी बोलताना त्यात त्यांचा सहजपणा दिसतो.
अभिनय बेर्डे याने साकारलेला निनाद जास्त लक्षात राहतो. त्याच्या अभिनयापेक्षा त्याचा आत्मविश्वास अधिक भाव खाऊन जाणारा, बोलका आहे. शहरात माणसे आधीच विभक्त कुटुंबात जगत असतात. त्यात प्रत्येकाला आपले आपले जीवन जगण्याचा आणि त्यात रमण्याचा शाप असतो. त्यांना सगळे हवे असते पण काही अंतर राखूनच इतरांनी आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करावी, अशी जी मानसिकता बनली आहे ती अभिनयने पडद्यावर हुबेहुब साकारली आहे. आई गेली तरी तिच्या आठवणी आपल्यासोबत आहेत, तिचे रेकॉर्ड केलेले संवाद त्याने बनवलेल्या “अन् मिस” या रोबोटमध्ये असल्याचे समाधान त्याला असते. पण इतरांशी तुसडेपणाने वागणारा निनाद आई गेल्यावर सहानूभूती नको म्हणणारा आतून किती घाबरला आहे, दुःखी आहे हे आईने त्याच्या प्रेयसीला ती गावी जाण्याआधी रेकॉर्ड करून दिलेल्या संवादातून उलगडते.
आई समोर असली काय किंवा बाहेर गेली असली काय तिचे लक्ष कायम तिच्या मुलांवर असते. आपण गेल्यावर अजूनही कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलाचे कसे होणार, या विचाराने ती घाबरते. ती त्याला सतत काय करायचे आणि काय नाही, असे सांगत उत्तर देत असते. शेवटी स्वतःबद्दल बोलताना आई हीसुद्धा एक माणूस असते, तिच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात, हे सांगण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच त्याच्या मनात लहानपणापासून अढी निर्माण झालेल्या एका अव्यक्त प्रश्नाला सोपे आणि सहज उत्तर देते आणि एका भावनिक क्षणी हा चित्रपट संपतो. ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत आणि इतर सहकलाकारांनी उत्तम काम केले आहे. उमा आणि निनादचे नाते मनात घर करून राहते. दिवसेंदिवस मराठी चित्रपटांचा कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसणारा देखणेपणा, सहज सुंदर चित्रीकरण या चित्रपटातही ठळकपणे दिसते. ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’ या सारखे चित्रपट आणि ‘दोन स्पेशल’, ‘भूमिका’ सारखी नाटके देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी उत्तरमध्ये कथा, पटकथा लिखाणासोबत पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत. क्षितिज पटवर्धन लिखित आणि रोंकिणी गुप्ता यांच्या आवाजातील ‘असेन मी’ हे गीत मनात रेंगाळत राहते. अमितराजचे “हो आई” देखील तितकेच मनाला भिडणारे आहे. तेजस जोशी, असीम कुऱ्हेकर आणि प्रतीक केळकर यांचे संगीत चित्रपटाला पूरक आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
