आदिनाथ साकारणार डिटेक्टिव धनंजय

एकीकडे स्वत:ची निर्मिती संस्था असलेल्या कोठारे व्हिजनची “नशीबवान” ही मालिका सुरू असतानाच अभिनेता आदिनाथ कोठारे याने काही दिवसांपूर्वी एक खास गिफ्ट प्रेक्षकांना देऊन नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. लवकरच तो “डिटेक्टिव्ह धनंजय” या नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा मुहूर्त नुकताच पार पडल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं.

झी-5 मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या वेबसीरिजमध्ये तो एका शीर्षक भूमिकेत असून या वेबसीरिजसाठी तो अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे.

मुंबईत “डिटेक्टिव धनंजय” या वेबसीरिजचा मुहूर्त झाला असून लगेच शूटिंगला सुरुवात झाली आहे. मराठी इंडस्ट्रीमधल्या दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन “डिटेक्टिव धनंजय“ या वेबसीरिजची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रा. लि. या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. गिरीश जोशी यांनी या सीरिजसाठी स्क्रीनप्ले लिहिला असून, श्रीरंग गोडबोले निर्मितीसोबतच दिग्दर्शनही करणार आहेत.

डिटेक्टिव धनंजय या वेबसीरिजबद्दल आदिनाथ सांगतो, “प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याकडे माझा कल असतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मला कायम नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भाग पाडतं. डिटेक्टिव धनंजयमधूनही काहीतरी खास घेऊन येणार आहोत हे नक्की ! कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशोमधून उलगडणार असून निर्माता आणि अभिनय या दोन्ही भूमिका म्हणूनच मा करणार आहे आणि मला याची फार उत्सुकता आहे. ओटीटी विश्वात काहीतरी वेगळं हटके घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *