‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची!!

Last updated on September 23rd, 2025 at 09:42 pm

‘दशावतार’ या चित्रपटाची कथा कोकणातली असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाची प्रशंसा केली.


ते पुढे म्हणाले, सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय, असेही त्यांनी स्पष्ट केले.मा. उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दशावतार’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसोबत शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.

Dashavtar marathi movie


‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाची उद्धवजींनी प्रशंसा केली आणि चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले.


कित्येक काळानंतर आपण मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला. ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे. केवळ कोकणातील लोकांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

‘दशावतार’ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, सुबोध खानोलकर, ओंकार काटेसह ‘दशावतार’च्या सर्वच निर्मात्यांचे अभिनंदन उद्धवजींनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *