‘तलास’मध्ये धम्माल हळदी गीत

मराठी सिनेसृष्टीतील आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘तलास’ हा आगामी मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागविणारा आहे. या चित्रपटाच्या कथानकात नेमके काय दडलेय याची कल्पना शीर्षकावरून अजिबात येत नाही. याउलट चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. नुकतेच या चित्रपटातील धम्माल गाण्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.

‘तलास’मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. उदय गणपत जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, कथा आणि पटकथालेखनही त्यांनीच केले आहे. संवादलेखन रुपाली कुटे यांचे आहे. विजय गाडेकर यांनी गीतलेखन केले असून, संगीतही त्यांनीच दिले आहे.

दादर क्लबमध्ये नुकत्याच आयोजित सोहळ्यात ‘तलास’ चित्रपटामधील धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं गीत प्रकाशित करण्यात आले. ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या गीतकार-संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर गौतमी पाटीलने नृत्य केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे.

या चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. डिओपी सचिन लोखंडे यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. कलादिग्दर्शन – अनिल केदार, वेशभूषा – धनश्री सालेकर, रंगभूषा – सुनील सावंत, छायाचित्रण – पंकज पटेल, पोस्ट प्रॉडकशन – संमित स्टूडियो, संकलन – सुबोध नारकर, ध्वनीआरेखन – विशाल राणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *