नाटक म्हणजे माझं माहेर…

शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. नाटक हे माझं माहेर असून या नाटकाच्या निमित्ताने मी माहेरीच परतल्याचा आनंद होतोय, असे त्या म्हणाल्या.

हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.

नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबीक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ‘ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं.

पाहिलं सगळं नेहमीच खास असतं. एवढ्या सगळ्या मात्त्तबर मंडळींसोबत माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येतयं याहून स्पेशल काही असू शकत नाही, अशी भावना लेखक प्रथमेश शिवलकर यांनी बोलून दाखविली.

योजना म्हटल्या की शासनाच्या एवढंच आपल्याला माहित आहे. शासनाची नाही मी सावंतांची योजना, हसवायला येतेय मराठी रसिकजना! असं मी गमतीने म्हणतो असं सांगत, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकामागे उभ्या असलेल्या भक्कम सपोर्ट सिस्टीमचं कौतुक याप्रसंगी केलं.

‘प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ’ असं सांगताना, निर्मिती सावंत यांनी माहेरी परतल्याचा आनंद बोलून दाखविला. नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना नाटक करायला मिळत नव्हतं आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर परत काम करायला मिळतंय याचा आनंद आहे. आजवर मी फक्त अष्टविनायक संस्थेसोबत काम केलं आहे. आमचे हे ऋणानुबंध खूप वर्षांपासून असून आम्ही हा बंध जपला आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रसाद आणि स्वप्नील सारखी हुशार कलाकार मंडळी जोडली गेली आहेत. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी आणि मॅडनेस यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ रसिकांना नक्कीच खुश करेल, असं अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या.

निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना सुनील जाधव यांनी केली असून गीतं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गायिका राधिका भिडे यांचा स्वरसाज आहे. वेशभूषा पुर्णिमा ओक तर रंगभूषा मदन गायकवाड यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *