झी मराठीवरील “कमळी” या मालिकत ‘अनिका’ ही खलनायिका साकारत केतकी कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या भूमिकेतील तिचा अभिनय आणि अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे.
कमळी या यशस्वी शोच्या माध्यमातून, केतकी आपल्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे, हा एक विलक्षण योगायोग ठरतोय. तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात १० वर्षांपूर्वी, झी मराठीवरील “अस्मिता” या गाजलेल्या मालिकेतून झाली. ‘पूजा’ ही भूमिका करताना, केतकी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती.

ती आठवण ताजी ठेवत केतकी म्हणते, “मी तीन वर्षांची असल्यापासून टीव्हीवर स्वतःला पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं, आणि झी मराठीमुळे ते पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर, मी सुमारे १२ महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय केला आहे. झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं आणि झी स्टुडिओज अंतर्गत माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यामुळे झी ही संस्था केवळ एक चॅनल न राहता माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम पाहत आली आहे , आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे. या १० वर्षांत, मी अनेक चढउतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना, मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे, वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची की यश नक्की मिळतं. “

केतकी कुलकर्णीचा आजचा टप्पा म्हणजे तिच्या कष्टांची आणि संयमाची फलश्रुती आहे. झी मराठीवर सुरू झालेला तिचा प्रवास, आज कमळीसारख्या यशस्वी मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. हे दशक तिच्यासाठी केवळ एक टप्पा नसून, एक भावनिक आणि प्रेरणादायक प्रवासही आहे ज्यात स्वप्न, आणि प्रामाणिक प्रयत्नांची झळाळी आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
