मराठी मनोरंजनविश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज ‘शुभ श्रावणी’ या आजपासूनच सुरू होणाऱ्या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करतेय. या मालिकेत ती शिक्षणमंत्र्यांच्या मुलीची भूमिका साकारतेय. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना वल्लरीनी अनेक गोष्टी उलगडल्या.
वल्लरी, ‘शुभ श्रावणी’मधल्या तुझ्या भूमिकेबद्दल सांग…
- माझ्या नवीन मालिकेचं नाव ‘शुभ श्रावणी’ आहे आणि माझं नाव मालिकेत श्रावणी आहे. ती शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे. म्हणून घरी प्रेमळ आपुलकीचं वातावरण नसून कडक नियमबद्ध असं वातावरण आहे. श्रावणीला आई नाहीये, तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाहीत. श्रावणीकडे पैसे मालमत्ता भरपूर आहे, तिच्या वडिलांनी सुखसोयी म्हणून मोठा बंगला, गाडी, कपडालत्ता, नोकर… सगळ्या सुविधा तिच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. पण तिच्याकडे तिच्या बाबांचं प्रेमच नाही. मुळात तिला माहिती पण नाही की का तिच्या बाबांनी लहानपणापासून तिच्याकडे बघितलं नाही? का ते तिच्याशी प्रेमाने बोलले नाहीत? का तिच्याशी ते असं तुटक वागतात? त्याचं मूळ काय कारण आहे? तेही तिला माहीत नाही. त्यामुळे श्रावणीचा सारखा प्रयत्न असतो की, असं काय करू जेणेकरून बाबा तिच्याकडे लक्ष देतील, ते तिच्याशी बोलतील. कदाचित परीक्षेत चांगले मार्क आणले की ते तिच्याशी बोलतील म्हणून ती भरपूर अभ्यास करते. तरीही तिला हवी तशी दाद आपल्या वडिलांकडून मिळत नाही.
‘नवरी मिळे हिटलरला’नंतर पुन्हा झी मराठीसोबत काम करतेयस. त्याबद्दल काय सांगशील?
- ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका संपल्यानंतरच मला खरं तर झी मराठीने सांगितलं होतं की, तुझ्यासोबत परत काम करायला आम्हाला आवडेल, मीही त्या क्षणाची वाट पाहत होते, आणि चार-पाच महिन्यानंतर मला कॉल आला, आम्हाला तुझ्यासोबत परत काम करायचंय, आमची ‘शुभ श्रावणी’ मालिका येतेय, त्यात श्रावणी व्यक्तिरेखेची भूमिका तूच करायचीय अशी आमची इच्छा आहे. मला ते ऐकून खूपच आनंद झाला, नकार देण्याचा काही विषयच नव्हता. अजिबात दुसरा तिसरा काहीच विचार न करता मी मालिका स्वीकारली. या भूमिकेसाठी खास तयारी केली आहे.
लीला आणि आता श्रावणी… तुला काय फरक वाटतो दोघींमध्ये?
- माझी आधीची जी भूमिका होती लीलाची, ती खूपच उत्साही, अल्लड होती. परंतु आता श्रावणी आहे ती समजूतदार, सोज्वळ आणि शांत अशी आहे, मनात कितीही तिला वाईट वाटलं असेल, तिच्या मनात कितीही प्रश्नांचा कल्लोळ असला तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वावरणारी अशी आहे. लीला आणि श्रावणी या परस्पर विरुद्ध व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे मला थोडी जास्त मेहनत करायला लागतेय.
आताची भूमिका आव्हानात्मक वाटली का?
- हो नक्कीच… श्रावणीची भूमिका करताना थोडंसं आव्हानात्मक वाटतं, कारण या भूमिकेत मला बऱ्याच भावनांचा मेळ दाखवायला लागतोय. मी मुळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात जशी आहे तशी श्रावणी अजिबात नाहीये. पण ते भूमिकेत मला करायला मिळतंय, याची मला मज्जा येतेय. प्रेक्षकांनाही माझी ही वेगळी बाजू पाहायला नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.
प्रोमोत तुझा चेहरा दिसत नव्हता…
- हो ना… पण पहिल्या प्रोमोपासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रोमोमध्ये माझा चेहरा दिसत नव्हता, तरीही प्रेक्षकांनी ओळखलं की ही वल्लरीच आहे, तो खूपच सुखद अनुभव होता माझ्यासाठी. प्रेक्षकांचं आजही तेवढंच प्रेम मिळतंय, ते खूप मेसेज करतायत, कंमेंट्स करतायत, मला टॅग करतायत, सगळेच म्हणतायत आम्ही वाट बघत होतो कि तू कधी परत येतेस. ह्या सगळ्याने खूपच छान वाटतंय, पण जबाबदारीही वाढलीय याचीही जाणीव होतेय. त्यामुळे थोडंसं दडपणही आहे. आता जास्त चांगलं काम करायचंय.

तुझ्या सहकलाकाराबद्दल काय सांगशील?
- आमची टीम खूपच मस्त आहे. लोकेश गुप्तेजी माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, आसावरी जोशी माझ्या आत्याचं काम करतायत. असं माझं कुटुंब आहे. त्यांच्यासोबत माझं खूप छान जमतं. मधल्या वेळेत आम्ही गप्पा मारतो, काही ना काही थट्टामस्करी करतो, काही ना काही आमचं सेटवर चालू असतं. आधीच्या मालिकेतल्या सानिका काशीकर आणि भुमीजा पाटील या पुन्हा माझ्यासोबत या मालिकेत आहेत. त्यामुळे आम्हा तिघींना तर खरंच खूप छान वाटतंय.
शूटिंगच्या वेळचा एखादा किस्सा सांगशील?
- शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगायचा तर, या मालिकेत जो मुख्य अभिनेता आहे सुमित पाटील त्याची आणि माझी पण पहिल्या दिवसापासूनच खूप छान भूमिका जमून आली आहे, त्याच्यासोबत शूट करताना खूप मज्जा येतेय. त्याचे आणि माझे थोडे असे हलके फुलके, टॉम अँड जेरीसारखे सीन असतात. त्यामुळे धमाल येते काम करताना. आमचं प्रोमोचं शूटिंग आणि मालिकेच्या काही सीन्सच शूटींग हे कोल्हापूरला होतं, आम्ही सगळे कलाकार तिथेच भेटलो.

अजून काही अविस्मरणीय असं…
- आमचं शूटिंग सुरू झाल्यावर माझ्यासोबत एक अपघातही झाला, ज्यात माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि तुम्ही माझ्या सोशल मीडियावर पाहिलेच असेल मी हाताला पट्टी बांधली आहे. प्रेक्षकांना काळजी करण्यासाठी कारण नाही, कारण मी रिकव्हर झालेय, सेटवर माझी खूप काळजी घेतली जात होती.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
