Last updated on September 27th, 2025 at 06:41 pm
इंद्रायणी मालिका – कलर्स मराठी | Indrayani Serial – Colors Marathi
कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले आहेत. सध्या मालिका एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. इंद्रायणीच्या स्वप्नात पुन्हा एकदा दैवी संकेत दिसतो. मोठं संकट जवळ येत असल्याचं भाकीत तिच्या मनात उमटतं. हे संकट नेमकं कोणतं, कोणावरून येणार आणि दिग्रसकर घराणं कसं गुंतणार याविषयी मात्र अद्याप गूढ दाटलेलं आहे. पण या गूढामागे जी व्यक्ती आहे ती म्हणजे श्रीकला. ती इंद्रायणी आणि तिच्या संपूर्ण परिवाराला नुकसान पोहोचवण्यासाठी, तिच्या जवळच्यांना तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी आली आहे. आणि तिचं पहिलं लक्ष्य आहे शकुंतला काकू, ज्यांना इंदू आईसारखी मानते. श्रीकलाचा असं करण्यामागचा नक्की कोणता हेतू आहे? तिचं इंदू आणि दिग्रसकर कुटुंबाशी वैर का आहे? हे हळूहळू उलगडेल. पुढे काय घडणार ते इंद्रायणी मालिकेतच कळेल. ही मालिका दररोज संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर दाखवली जाते.
आतापर्यंत श्रीकला बाबतीत मनात अडी ठेवणारी इंद्रायणी व्यंकू महाराजांच्या सांगण्यावरून श्रीकलाशी मैत्री करते, पण श्रीकलाविषयी काहीतरी कुठेतरी चुकते आहे याची सतत रुखरुख इंदूच्या मनाला लागली आहे. दोघींमधले गैरसमज दूर होऊन मैत्री झालेली दिसणार आहे. पण, हे काही क्षणांसाठी असणार का? इंदू घरी परतल्यावर अधूसोबतची तिची हलकीफुलकी नोकझोक, त्याचं फोनमध्ये गुंतून जाणं आणि इंदूचं खट्याळ प्रेमळ चिडवणं, या सगळ्यामुळे वातावरण हलकं झालं. पण या हसऱ्या क्षणांमागे श्रीकलाचा खरा हेतू काय आहे, हा प्रश्न मात्र कायम आहे.
याच दरम्यान, दुसरीकडे श्रीकलाचं घर, तिच्याभोवती पसरलेलं गूढ वातावरण आणि तिच्या आयुष्यात सोबतीला असणारी रत्नासोबतचे संवाद या मालिकेला थरारक वळण देत आहेत. इंद्रायणीची भक्ती आणि श्रीकलाचे कपटी डाव यांच्या संघर्षातून इंदू स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला कशी वाचवणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी सर्वांत रोमांचक ठरणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
