परेश रावल यांचे प्रतिपादन
मुंबई : “आजच्या काळातही अशा प्रकारचे रंगमंचीय महोत्सव यशस्वी होतात ही आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांचा आत्मविश्वास वाढतो.” अशा शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योगपती स्व. रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त २८ डिसेंबर रोजी संस्थापक अभिषेक नारायण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव ‘नाट्य रतन’ चा समारोप पार पडला. या समारोप सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून परेश रावल बोलत होते. यावेळी त्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
परेश रावल पुढे म्हणाले, “रतन टाटा यांना समर्पित ‘नाट्यरतन’ उपक्रमाची, मी स्वतः एक थिएटर कलाकार म्हणून, मनापासून प्रशंसा करतो. अशा उपक्रमांमुळे प्रेक्षकांना दर्जेदार व नावीन्यपूर्ण नाटके पाहण्याची संधी मिळते.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

परेश रावल यांनी यावेळी नाटक “पॉपकॉर्न” हे नाटक पाहिले. या नाटकातील कलाकार आनंद इंगळे, अंबर गालपुडे, गायत्री देशपांडे, दीप्ती लेले, श्रीकर पित्रे, सचिन जोशी, नितीन अग्निहोत्री आणि अर्णव वॉरियर यांच्या अभिनयाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कारवाँ थिएटर ग्रुप, मुंबई यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आणि क्युरेटेड क्लासिक्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाट्य रतन सीझन १’ या बहुभाषिक आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सवाचे आयोजन २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम) येथे करण्यात आले होते. महोत्सवाची सुरुवात मकरंद देशपांडे यांच्या नाटकाने झाली, तर समारोप परेश रावल यांच्या उपस्थितीत झाला.
नाट्यरतन आणि कारवाँ थिएटर ग्रुपचे संस्थापक अभिषेक नारायण यांनी सांगितले, “स्वर्गीय रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त ‘नाट्यरतन’चे यशस्वी आयोजन करता आले, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. हा महोत्सव त्या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांना समर्पित एक भावनिक रंगमंचीय श्रद्धांजली होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे, कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या यशामुळे आम्हाला भविष्यात अधिक मोठ्या स्वरूपात काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ‘नाट्य रतन’ हा वार्षिक रंगमंच महोत्सव म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस असून, भारतीय रंगमंचाच्या माध्यमातून श्री. रतन टाटा यांच्या स्मृती व वारसा यांना सातत्याने आदरांजली अर्पण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
चार दिवस चाललेल्या या रंगमंच महोत्सवात हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतील एकूण १२ नाटकांचे सादरीकरण झाले.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
