लाइफ हिल गई – निसर्गरम्य… पण रसहीन! | Life Hill Gayi Review Web Series

Life Hill Gayi Review Web Series

Last updated on September 27th, 2025 at 06:42 pm

कोणत्याही कथानकात प्रेक्षक गुंगून जाण्यासाठी त्यात काही तत्त्वे असायला हवी असतात. त्यात मनोरंजन हवं असतं, त्यात भावनात्मक प्रसंग अपेक्षित असतात आणि मुख्य म्हणजे पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहणं महत्त्वाचं असतं. डिस्ने प्लस हॉटस्टारवर नुकतीच दाखल झालेली ‘लाईफ हिल गयी’ या सहा भागांच्या वेबसीरिजमध्ये यापैकी नेमकं काय आहे तेच कळत नाही. ही वेबसीरिज विनोदीही नाही की ज्यामुळे प्रेक्षक मनमुराद हसू शकतील.


आता या वेब मालिकेचं कथानक पाहिलं तर एक भावाबहिणीची जोडी आहे. देव (दिव्येंदू शर्मा) आणि त्याची बहीण कल्की (कुशा कपिला). हे दोघे उत्तराखंडमधल्या एका निर्जन भागात असलेल्या आजोबांच्या हवेलीत येतात. ही हवेली हॉटेलमध्ये बदलून त्यातून काहीतरी कमाई करून दाखवण्याचे कठीण काम या भावंडांवर त्यांचे आजोबा टाकतात. हे काम ते करणं शक्यच नाही हे जाणून आजोबांनी त्यांना आपली पूर्ण जायदाद देण्याचे लालच ते या दोघांना देतात. जो जास्त चांगला ठरेल त्याला पॉइंट्स मिळणार आहेत. गावातल्या लोकांमधूनच हे दोघेजण हॉटेलसाठी कर्मचारी निवडतात. पण या कर्मचार्‍यांचं कामाकडे लक्षच नसते. भाऊबहीणही कशाही परिस्थितीत हॉटेल चालावे यासाठी धडपडतात. एवढेच कथानक आहे.


वेबसीरिजच्या प्रारंभापासूनच प्रेक्षक म्हणून तुम्हाला व्यक्तिरेखा आणि त्यांची कामं यांच्याशी जुळवून घेण्याचं दिव्य करावं लागतं. दिग्दर्शक प्रेम मिस्त्री यांनी पहाडी प्रदेशातला एक साधारण प्लॉट घेऊन तो सहा भागांमध्ये पसरला आहे. पण सीरिजमध्ये कुठलाही संघर्ष नाही, धक्कातंत्र नाही आणि काही घडतच नाही. यामुळे असे किती भाग पाहात राहायचे असा विचार प्रेक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही. सहा भाग असूनही कमजोर पटकथेमुळे कथा पुढे सरकतच नाही.


‘मिर्झापूर’ या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये मुन्नाभाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिव्येंदू शर्मा याने यात देवची भूमिका केली आहे. हा देव या सीरिजमध्ये थोडा चतूर दाखवला आहे, पण त्याच्या व्यक्तिरेखेत सखोलता नसल्यामुळे दिव्येंदूला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळूनही काही करता आलेले नाहीये. हेच सीरिजमधल्या इतर कलाकारांबद्दलही बोलता येईल. यात कुशा कपिला आणि विनय पाठक यांचाही समावेश आहेच. विनय पाठक यांनी देव आणि कल्की यांच्या वडिलांची भूमिका अतिशय सहजतेने केली आहे. पण त्यांच्यासारखा चांगला कलाकार या सीरिजमध्ये दारुडा म्हातारा म्हणून दाखवून वाया घालवला आहे. दिग्दर्शकाला त्यांच्याकडून चांगले काम करून घेता आले नाही. पहाडी गावातलीच एक मुलगी म्हणून मुक्ती मोहन ती शोभत नाही. ती शहरातली पढीलिखी तरुणीच वाटते. असो. पण तिने अभिनय खूप छान केला आहे. यात ती आजच्या काळातली तरुणी असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहे असेच दाखवण्यात आले आहे. कबीर बेदी केवळ कॉम्प्युटर स्क्रीनवरच दिसतात. हेमंत पांडे बर्‍याच काळाने पाहिल्यामुळे या सीरिजमध्ये काहीतरी विनोदी पाहायला मिळेल असे वाटत राहाते, पण ओमफस होते.


या वेबसीरिजमधली चांगली बाब म्हणजे यातले पहाडी प्रदेशाचे नितांत सुंदर छायाचित्रण. पटकथा कमजोर असूनही हे निसर्गसौंदर्य पाहायला खूप मजा वाटते. अशा प्रकारच्या कथानकात कॉमेडी पंच जागोजागी असणं गरजेचं असतं, पण यात तसे काही घडलेले नाही. यामुळे यातील काही सीन्स वगळता प्रेक्षकांना हसण्यासारखेही काही नाही. एकूण काय, तर ‘लाइफ हिल गयी’ या वेबसीरिजमध्ये काही विशेष नाहीये. हॉटस्टारवरील अनेक वेब शोमध्ये या शोमुळे एकाची भर पडली आहे एवढेच म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *