नम्रता आणि तुषार करणार ‘काहीतरी वेगळे’

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवेत एक वेगळीच हुरहूर जाणवू लागते. प्रेमाचे वारे हळुवारपणे मनाला स्पर्श करू लागतात आणि या भावनांना शब्द देण्यासाठी येतो तो खास दिवस १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. एरवी मनातच दडवून ठेवलेल्या भावना, न बोललेले शब्द आणि व्यक्त न झालेलं प्रेम या दिवशी धाडस करून समोर येतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देणं, नात्याला नवी सुरुवात देणं किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाची ऊब निर्माण करणाऱ्यांसाठी हा दिवस खास ठरतो.

अभिनेत्री नम्रता गायकवाड यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला ‘काहीतरी वेगळे’ करणार आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचे आणि अभिनेता तुषार कावळे याचे काही रोमँटिक फोटोज पहायला मिळतायेत. हे दोघे एकमेकांना डेट करतायेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे, तर या दोघांचं एक ‘काहीतरी वेगळे’ हे नवं, फ्रेश सोलो गाणं ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मूहूर्तावर रसिकांच्या भेटीला येतंय.

हे गाणं केवळ एका जोडप्याची कथा सांगत नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांचा आरसा ठरतं. आपण खरंच क्षण जगतोय… की फक्त त्यांना पोस्ट करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे अधोरेखित करतं. युथफूल आणि भावस्पर्शी असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलंय. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन, लिरीक्स आरोह कांगो यांनी केलं असून, देव आहिरराव आणि साक्षी यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे.

गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, सह-दिग्दर्शक म्हणून मयूर परांकर यांनी साथ दिली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून स्वप्नील पाटील यांनी प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे. भावना, वास्तव आणि प्रश्नांची गुंफण असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं आजच्या पिढीला नात्यांकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडणारं ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *