हॉरर कॉमेडीत प्रथमेश आणि पॅडी…

हॉरर-कॉमेडीपटांनी रसिकांना नेहमीच भुरळ घातली आहे. चार मित्रांची गोष्ट सांगणारा ‘हुक्की’ हा आगामी मराठी चित्रपटही क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा आहे. ‘हुक्की’च्या पहिल्या पोस्टरनंतर या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रवाहापेक्षा वेगळा विषय असल्याने ‘हुक्की’च्या फर्स्ट लुकने प्रदर्शित झाल्यापासूनच रसिकांचे लक्ष वेधले आहे.

कथालेखनासोबतच ‘हुक्की’चे दिग्दर्शन नितीन रोकडे यांनी केले आहे. ‘हुक्की’चा फर्स्ट लुक रसिकांचा उत्साह वाढविणारा आहे. कावळ्याचा लालभडक डोळा उघडतो आणि फर्स्ट लुकची सुरुवात होते. त्यानंतर समुद्रकिनारी कोळी बांधव होडी ओढत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. या दृश्यामागोमाग तीन तरुण आणि एक तरुणी यांची चौकडी चालत येत असल्याचे दिसते. त्यांना फोर लुझर्स असे संबोधले गेले आहे. त्यानंतर एक भयावह रात्र सुरू होते. या रात्री चौघेही काहीशा विचित्र परिस्थितीत अडकतात.

अभिनेता प्रथमेश परब आणि विनोदाचा बादशाह पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. फर्स्ट लुकबाबत नितीन रोकडे म्हणाले की, ‘हुक्की’च्या कथानकाचा बाज लक्षात घेऊन फर्स्ट लुक तयार करण्यात आला आहे. हा फर्स्ट लुक अत्यंत कमी वेळात आपले काम चोख बजावणारा आहे. हॉरर-कॉमेडीपटासाठी पोषक ठरणारी वातावरणनिर्मिती, कलाकारांचा लूक, पार्श्वसंगीत, सबटायटल्स यांचा सुरेख वापर ‘हुक्की’च्या फर्स्ट लुकमध्ये आहे.

दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी संदीपकुमार रॅाय आणि मधुलीता दास यांच्यासोबत ‘हुक्की’ची पटकथाही लिहिली आहे. अतिरिक्त पटकथा निनाद पाठक व संजय नवगिरे यांनी लिहिली आहे. या चित्रपटात प्रथमेश-पॅडीसोबत रावी किशोर, प्रशांत मोहिते, महेश पाटील, आरती चौबळ, वर्षा धांदळे, मोहक कंसारा आणि पंकज विष्णू आदी कलाकार आहेत. राघवेंद्र व्ही. आणि प्रफुल-स्वप्नील यांनी या चित्रपटातील गीते संगीतबद्ध केली आहेत. साऊथमधील सुप्रसिद्ध संगीतकार राघवेंद्र व्ही. ‘हुक्की’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. फारुख खान यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, नृत्य दिग्दर्शन संतोष पालवणकर आणि इमरान मालगुणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *