स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘काजळमाया’ मालिकेच्या टिझरने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. मालिकेत दिसणारी ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. प्रोमोमध्ये दिसणारी ‘ती’ म्हणजे विलक्षण सुंदर आणि तंत्रविद्येत प्रविण असलेली चेटकीण पर्णिका. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे.
रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया. काजळमाया मालिकेतून नवोदित अभिनेत्री रुची जाईल मालिका विश्वात दमदार एण्ट्री करत आहे.

आपल्या भूमिकेविषयी रुची म्हणाली, ‘ही माझी पहिलीवहिली मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं मी पाहिलेलं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. काजळमाया मालिकेत मी विलक्षण सुंदर अशा चेटकिणीच्या रुपात दिसणार आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला चेटकीणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी देखील एका क्षणासाठी घाबरले. मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे तितकच उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पहाण्याची उत्सुकता वाढेल. नव्या रुपात आणि नव्या माध्यमात मी पाऊल टाकलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम मिळावं इतकीच अपेक्षा आहे.’

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
