काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रीकृष्णाच्या रुपातील मनमोहक फोटो टाकून अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांना मोहित केलं. मात्र हा लुक नक्की कशासाठी होता, याचं उत्तर आत्ता संस्कृतीने प्रेक्षकांना दिलंय.
कायम सोशल मीडियावर सक्रीय असणारी संस्कृती बालगुडे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आता ती अजून एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फॅशन कॉन्सेप्ट फोटोशूट आणि अभिनय यांच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना असलेली संस्कृती लवकरच एका डान्स ड्रामामधून प्रेक्षकांना मोहित करणार आहे.

आजवर संस्कृतीने अनेक मुलाखतीमधून तिचं आणि श्रीकृष्णाचं नातं याबद्दल भाष्य केलं असून आता संस्कृती एक कमाल नवीन डान्स ड्रामा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृतीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही खास गिफ्ट तिच्या फॅन्सना दिलं आहे.

संस्कृतीच्या नव्या प्रोजेक्टचं नाव खूप लक्षवेधी असून “संभवामि युगे युगे” या नृत्य ड्रामामधून काय अनुभूती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे यासाठी सगळेच उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना संस्कृती सांगते, “मला समजलेल्या कृष्णाबद्दल छान काहीतरी करावं असं वाटतं. गेले वर्षभर ही संकल्पना माझ्या मनात होती. या संपूर्ण ड्रामासाठी मी स्वतः नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या शोमधून मला उमजलेल्या कृष्णाबद्दलची गोष्ट, त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना या कृष्णरुपी पद्धतीने मांडायचा होत्या आणि त्या मी भरतनाट्यम नृत्य सादरीकरणातून मांडल्या, याचा खूप आनंद आहे. मुळात मला फक्त इव्हेंटच्या निमित्तानं भरतनाट्यम करण्याची संधी मिळायची, पण माझ्या आवडत्या डान्स फॉर्ममधून हा संपूर्ण शो करण्याची संधी या निमित्तानं मला मिळतेय.”

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
