दिवाळी ही अशीच एक संधी आहे जी आपल्याला आप्तेष्ट, सखेसोबती आणि भावंडांबरोबर जुन्या आठवणी जागवण्याची संधी देते. कलाकार देखील त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना करत आहेत. अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने आपल्या दिवाळीच्या आठवणी आणि दिवाळी साजरी करण्याच्या खास पद्धती सांगितल्या.

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर म्हणाली, “जर सुट्टी मिळाली तर मी माझ्या आई- वडिलांबरोबर दिवाळी साजरी करेन. माझ्या लहानपणीची एक खास आठवण म्हणजे माझ्या नानीच्या घरी आम्हा लहान मुलांमध्ये दरवर्षी पहाटे ४ वाजता कोण पहिलं फटाका वाजवतो याची स्पर्धा असायची. आई-वडिलांनी आणलेले नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं, हे फार जिव्हाळ्याचं आहे माझ्यासाठी. गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं थांबवलं आहे कारण वायूप्रदूषण खूप होतं. माझ्या छोट्याशा कृतीने निसर्ग वाचत असेल तर का नाही? मात्र दिवाळी साजरी करण्याचे विविध मार्ग आहेत. मी कुटुंबासोबत फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे हा माझ्यासाठी दिवाळीचा एक खास भाग आहे.” प्राप्ती पुढे म्हणाली “माझं व्यक्तिमत्व फुलबाजी आणि चकरी सारखं आहे. फुलबाजीसारखं ‘तडतड’ करत मी सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
