मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बदलणं नाही, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, आयुष्य नव्याने जगायला शिकविण्याचा अनुभव असतो. आणि हाच अनुभव मोठ्या पडद्यावर आणणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट तीन मित्रांच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. आणि या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे.

‘सखे गं साजणी’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील तीन लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर… पोस्टरवरील तिघांचा कुल अंदाज आताच्या तरुणाईची उत्सुकता वाढविणारा आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत स्वछंदी जगण्याचा आनंद लुटण्याचा केविलवाणा प्रयत्न या तिघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे. पोस्टरवरून ही तिघांची मैत्री अर्थात वेगळी आहे हे स्पष्ट करतंय. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक जावकर यांनी केले आहे.
पोस्टर पाहून हा चित्रपट मैत्रीची नव्याने ओळख करून देणार असल्याचं दिसतंय. तसेच ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे घोषित केले गेले आहे. अर्थात पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
