अविनाश ही भूमिका चॅलेंजिंग – हरीश दुधाडे

सन मराठी वाहिनीवर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर व अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या १ डिसेंबरपासून ही मालिका सुरू होतेय. या मालिकेत हरीश दुधाडे हा अविनाश ही व्यक्तिरेखा साकारतोय. अविनाशचा स्वभाव हा हुकूमशाही प्रवृत्तीचा, स्वार्थी आणि प्रत्येक चुकीसाठी अनुप्रियाला जबाबदार धरणारा आहे. अविनाशचा आपल्या कुटुंबाशी नक्की असा का वागत असावा? याबाबत अविनाशची बाजू काय असेल? हे पाहणं रंजक ठरेल. ‘जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं’ या तत्त्वावर ही मालिका आधारित आहे.

मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका हरीश दुधाडे साकारतोय. अविनाश या भूमिकेविषयी सांगताना हरीश म्हणाला, आतापर्यंत मी अशी भूमिका साकारली नव्हती. मला प्रेक्षकांनी नेहमीच सकारात्मक भूमिकेत पाहिलं आहे. त्यामुळे प्रोमो पाहून संमिश्र प्रतिसाद मिळाला. अविनाशबद्दल सांगायचं झालं, तर तो नकारात्मक नाहीये. लहानपणापासून झालेले संस्कार, पुरुषप्रदान संस्कृतीला दिलेलं महत्त्व, परिस्थिती, डोक्यावर असलेलं कर्ज या सगळ्या गोष्टीने तो थोडा त्रासलेला आहे. म्हणूनच त्याचं वागणं इतरांना खटकतं, पण तो त्याच्या कुटुंबावरही तितकंच प्रेम करतो. प्रेक्षकांना माझ्या या भूमिकेचा नक्कीच राग येऊ शकतो आणि त्यासाठी मी तयार आहे. कारण तीच माझ्या कामाची पोचपावती असेल, असे त्याने स्पष्ट केले.

तो पुढे म्हणाला, कधी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय, ही उत्सुकता लागली आहे. प्रोमो पाहून कुटुंबातही आनंदाचं वातावरण आहे. मी घरात कधीच कोणावर चिडत नाही. हसतं खेळतं वातावरण मला खूप आवडतं. एकंदरीतच अविनाश आणि मी पूर्णपणे वेगळा असल्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. मालिकेतील माझे इतर सहकलाकार खूप भन्नाट आहेत. आम्ही सगळेच १ डिसेंबरची वाट पाहत आहोत. आतापर्यंत प्रेक्षकांनी प्रत्येक पात्राला खूप प्रेम दिलं यापुढेही हे प्रेम, आशीर्वाद कायम राहू दे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *