राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरुण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले
यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे.
‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता २६ डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
