अजय देवगणच्या आवाजात ‘शतक’चे ट्रेलर

‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुपरस्टार अजय देवगण याच्या प्रभावी आवाज प्राप्त झाल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. त्याच्या आवाजामुळे ट्रेलरमध्ये गांभीर्य आणि भावनिकता वाढली असून प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते.

ट्रेलरमध्ये त्याग, संघर्ष आणि राष्ट्रप्रथम या भावनेने प्रेरित १०० वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. शिस्त, सेवा आणि समर्पण यांच्या बळावर समाज आणि देशासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्यांना हा चित्रपट अर्पण करण्यात आला आहे.

हा चित्रपट अशा एका विचारसरणीची कथा सांगतो, जिचा काळानुसार अंत होईल असे कधी वाटले होते. मात्र प्रत्येक पिढीसोबत ती अधिक मजबूत होत गेली. गुरुजी एम. एस. गोलवलकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत, संघ ‘काळासारखा अखंड’ असल्याचे चित्रपटात मांडले आहे. लोकांना जोडणे हे या प्रवासाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. हा चित्रपट केवळ इतिहास सांगत नाही, तर अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या समजुती आणि गैरसमजांवरही आपली भूमिका मांडतो.

चित्रपटाबद्दल अजय देवगण म्हणाला, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.”

‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *