Last updated on September 27th, 2025 at 06:40 pm
विजया बाबरची आत्मशक्तीची कथा
नवरात्र म्हणजे शक्तीची, भक्तीची आणि स्त्रीत्वाची विविध रूपं. देवीचं रूप ही केवळ धार्मिक संकल्पना नसून, ती जीवन जगण्याची एक प्रेरणा आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे कमळीची म्हणजेच आपल्या ‘विजया बाबर’ हिची. विजयाने आपल्या आयुष्यात नवदुर्गांचे नऊ गुण आत्मसात केले आहेत. तिच्या जीवनातील अनुभव, संघर्ष, स्वावलंबन आणि आत्मविश्वास यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व एक मूर्तिमंत शक्तिस्वरूप कसं बनलं ते तिने सांगितले.
ती म्हणते, “गेल्या पाच वर्षांपासून मी स्वबळावर जगतेय. माझं आर्थिक नियोजन, घर चालवणं आणि प्रत्येक जबाबदारी मी स्वतः सांभाळते. ही ताकद म्हणजेच शैलपुत्री देवीची स्थिरता, धैर्य आणि आत्मविश्वास मला वाटतो. ब्रह्मचारिणी देवीसारखी शिस्त, आत्मसंयम, आणि एकाग्रता माझ्या स्वभावाचा भाग आहे.

मी कधीही क्षणात प्रतिक्रिया देत नाही, आधी विचार करते, मग बोलते. ही चंद्रघंटा देवीची संयम आणि शांतीची प्रेरणा आहे. माझ्यातील सृजनशीलता आणि ऊर्जा ही कुठल्याही नवीन भूमिकेत तिला सहज सामावून घेते. मी आपल्या आयुष्यात कुशमांडा देवीसारखी ऊर्जा अनुभवते. काहीही नवीन सुरु करायचं असेल, तर माझ्याकडे ती जिद्द आणि सर्जनशक्ती असते.
स्कंदमातेप्रमाणे मी माझ्या जवळच्या लोकांविषयी खूप प्रेमळ आणि रक्षणाची भावना ठेवते. कोणत्याही प्रसंगात मी त्यांच्यासोबत उभी असते. कात्यायनी देवीचं उग्र रूप अजून कधीच बाहेर आलं नाही, पण चुकीच्या गोष्टींचा सामना करण्यासाठी माझ्यात ती जिद्द आणि न्यायासाठी उभं राहण्याचं बळ आहे, याची मला जाणीव आहे आणि तशीच भूमिका मी सध्या कमळी म्हणून साकारत आहे. मी नेहमी सकारात्मक लोकांमध्ये राहते, नकारात्मकतेपासून दूर राहते हेच कालरात्री देवीचे गुण माझ्यात आहे.
माझं आयुष्य महागौरीप्रमाणे शांतीपूर्ण आहे. सिद्धिदात्री देवीसारखी परिपूर्णता आणि समजून घेण्याची ताकद मी नेहमी साध्य करण्याचा प्रयत्न करते. मी परिपूर्ण नाही, पण प्रत्येक गोष्ट चांगली करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करते. या सगळ्या गुणांचा पाया माझ्या आईकडे आणि बहिणीकडे आहे. माझं कुटुंब माझं शक्तिस्थान आहे. पण मी स्वतंत्र राहायला लागल्यावर, काम करायला लागल्यावर, हे गुण मी स्वतःमध्ये वाढवले, असं विजयाने भावनिकपणे सांगितले.
माझा जन्म विजयादशमीच्या दिवशी झाला म्हणून माझं नाव ‘विजया’ ठेवलं. त्यामुळे नवरात्र आणि दसरा यांच्याशी माझं खूप खोल नातं आहे. हा सण मला केवळ धार्मिक नाही, तर वैयक्तिकरित्या आत्मशक्तीची आठवण करून देतो.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
