सण म्हणजे आपलेपणाचा, प्रेमाचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंददायी अनुभव. दिवाळी ही अशीच एक संधी आहे जी आपल्याला आप्तेष्ट, सखेसोबती आणि भावंडांबरोबर जुन्या आठवणी जागवण्याची संधी देते. कलाकारही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची योजना करत आहेत. अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने दिवाळीच्या आठवणी आणि दिवाळी साजरी करण्याच्या तिच्या खास पद्धती सांगितल्या.

‘तुला जपणार आहे’ मालिकेतील मीराची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणाली, “दिवाळी आम्ही खूप पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. नरक चतुर्दशीला लवकर उठून उटणं लावणं, दिवे लावणं, कुटुंबासोबत फराळ करणं, देवदर्शन आणि नातेवाईकांना भेटणं हे सगळं एकत्रित करत दिवाळीची मजा वाढते. या वर्षी मी खूप उत्सुक आहे कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी, कारण ‘तुला जपणार आहे’ च्या शूटमुळे कुटुंबाला भेटायला वेळ मिळत नाही. पण दिवाळीच्या दिवशी मी घरीच असणार आहे. दरवर्षी आम्हा भावंडांची एक परंपरा आहे की आम्ही भाऊबीजेच्या दिवशी कुठेही असलो तरी एकत्र येतो. माझा भाऊ ध्रुव माझ्या खूप जवळचा आहे. ध्रुव आणि माझी तन्वी ताई दोघांनीही मला खूप साथ दिली आहे, मार्गदर्शन, कौतुक केलं आहे आणि मला माझ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत केली.”
दिवाळी म्हणजे एकत्र येण्याचा आणि आपुलकीच्या बंधांनी नाती घट्ट करण्याचा सण आहे. कलाकारांच्या या आठवणी आपल्या साऱ्यांनाही आपल्या बालपणात घेऊन जातात. नात्यांची ही दिवाळी अशीच प्रेमाने उजळत राहो.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
