अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अष्टपैलू कलाकार हृषिकेश जोशी हे रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ च्या सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर हृषिकेश जोशी यांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून हे दुसरे मोठे नाटक असून, या प्रयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हृषिकेश जोशी यांनी हे नाटक वर्तमान सांस्कृतिक, समाजकारण आणि राजकारण यावर मार्मिक भाष्य करणारे असल्याचे सांगितले आहे. एनएसडीच्या फॉर्मर डिरेक्टर अनुराधा कपूर यांनी ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर हृषिकेश यांना या नाटकाच्या विषयावर लेखन करण्याची कल्पना सुचवली.
‘बोलविता धनी’ हे केवळ भाष्य करणारे नाटक नसून, ते एक रंजक आणि परिपूर्ण मनोरंजन आहे. यात भरपूर विनोद आहे, उत्तम ड्रामा आहे, एक सुंदर लव्हस्टोरी आहे आणि काही जुन्या घटनांचे संदर्भही यात पहायला मिळतील. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोष्ट एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास हृषिकेश जोशी व्यक्त करतात.

या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेले क्षितीश दाते, संग्राम साळवी, ओंकार कुलकर्णी, मयुरा रानडे, सिमरन सईद यांसारखे ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्यासह प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, सागर यार्दी, अजिंक्य पोंक्षे, दीपक गोडबोले, निलेश गांगुर्डे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे, या नाटकात रंगभूमीच्या पडद्यामागील महत्त्वाचे कलाकार म्हणजेच मेकअपमन, प्रोडक्शन मॅनेजर, हेअर ड्रेसर आणि वेशभूषाकार हे व्यावसायिकही पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत, जे या नाटकाचे वेगळेपण अधोरेखित करते.
हृषिकेश जोशी यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २४ डिसेंबरला होणार आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
