Last updated on September 27th, 2025 at 06:40 pm
खलनायकच बाजीगर… | The villain is a magician 2024
खलनायक जेवढा प्रचंड, तेवढा नायक शूरवीर हे समीकरणच आहे. रावण महाबलवान होता, म्हणून तर प्रभू श्रीरामांना महाशक्तिमान मानलं गेलं. सरत्या वर्षात सुपरहीट झालेल्या चित्रपटांचे खलनायकही आगळेवेगळे आणि बलाढ्य होते. यामुळेच त्यांचा नायनाट केल्याने नायक गाजले. 2024 मधले असेच काही गाजलेले खलनायक पाहूया…
डेंजर लंका
अभिनेता अर्जुन कपूर याला नायक म्हणून बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडता आला नव्हता. पण क्रूर खलनायक म्हणून त्याने स्वत:ला दमदारपणे सिद्ध केले. रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम अगेन’ सिनेमात त्याने खणखणीत डेंजर लंका ही भूमिका केली आहे. अजय देवगण, अक्षयकुमार, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंह यांच्यावर तो एकटा भारी पडताना दिसतो. या सिनेमाने बऱ्यापैकी यश मिळवलं, पण अर्जुन कपूर खूपच गाजला हे मात्र नक्की.
सरकटा
सरत्या वर्षात ‘स्त्री-2’ या सिनेमाने अनपेक्षितरीत्या दमदार यश मिळवले. 11 ऑगस्टला तो रिलीज झाला होता. या हॉरर कॉमेडी सिनेमानो बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती. यात 7 फूट उंचीचा ‘सरकटा’ नसता तर त्याला एवढे यश मिळाले नसते. प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी ही भूमिका सुनील कुमार याने केली होती. त्याने आधीही काही चित्रपट केले होते, पण त्याला ओळख मिळाली ती ‘सरकटा’ म्हणूनच… श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांना तो पुरून उरतो.
वनराज कश्यप
साऊथ आणि हिंदी सिनेमाविश्वात संवेदनशील अभिनेता आर. माधवन याने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. कुठलीही भूमिका तो सुपर्बच करतो. सरत्या वर्षात त्याने सुपरस्टार अजय देवगणच्या ‘शैतान’ या सिनेमात खलनायकी केली. पण नायकापेक्षा त्याच्या ‘वनराज कश्यप’ या खलनायकाने कमालच केली. अजय देवगन आणि ज्योतिका यांच्या या सिनेमात आर. माधवन याने काळी जादू करणाऱ्याची भूमिका केली होती. हा सिनेमा गुजरातीतल्या ‘वश’ सिनेमाचा रिमेक होता.
सुप्रीम यास्किन
प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या ‘कल्की 2898 एडी’ या सिनेमाने सरत्या वर्षात 1100 कोटींची प्रचंड कमाई केली होती. ‘पुष्पा-2’ त्यानंतर आलाय. ‘कल्की’मध्ये साऊथ सुपरस्टार कमल हासन यांनी मुख्य खलनायक सुप्रीम यास्किन ही व्यक्तिरेखा केली आहे. कमल हासन यांचा हा रोल आणि या रोलसाठीचा लुक धक्कादायक होता. नाग अश्विन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे, तर अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, एस. एस. राजामौली, रामगोपाल वर्मा वगैरे प्रमुख भूमिकेत आहेत.
बब्बर शेर
याच आठवड्यात 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी बब्बर शेर नावाची क्रूर खलनायकाची भूमिका केली आहे. याद्वारे त्यांनी प्रेक्षकांना घाबरवले आहे. तो क्रूर होता म्हणूनच नायक वरुण धवनला उठाव मिळाला आहे. साऊथच्या ‘थेरी’ या सिनेमाचा बॉलिवुड रिमेक असलेल्या या सिनेमाला काही खास यश मिळालेले दिसत नाही, पण बब्बर शेर ही भूमिका मात्र खूप गाजली आहे.


लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
