‘दिल दिवाना हो गया’ ३१ जुलैला

मुंबई : दिग्दर्शक राजीव श्यामलाल सोनी यांच्या ‘दिल दिवाना हो गया’ या रोमँटिक चित्रपटाचा प्रोमो आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटातून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री काजल चौहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्यासोबत भानूज सूद आणि शुभकरण भोपाल हे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

दिग्दर्शक राजीव श्यामलाल सोनी यांनी सांगितले, संपूर्ण चित्रपट पूर्ण होईपर्यंत त्यांची निर्मात्यांशी प्रत्यक्ष भेट झाली नाही. फोनवर चर्चा होत राहिली, मात्र परस्पर विश्वासामुळे चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण झाला. चित्रपटाबद्दल बोलताना सोनी म्हणाले, “हा एक रोमँटिक फॅमिली ड्रामा आहे. कथा एका प्रेमत्रिकोणाभोवती फिरते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत उत्सुक ठेवते. चित्रपटातील गाणी 90च्या दशकातील सुरेल संगीताची आठवण करून देतील.”

काजल चौहान म्हणाली, दूरदर्शनमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हे मोठे आव्हान असते. “निर्माता आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवून उत्कृष्ट भूमिका दिली, यासाठी मी त्यांची आभारी आहे,” असे ती म्हणाली. मुश्ताक खान यांनी सांगितले, “या चित्रपटात मी डॉक्टरची भूमिका साकारली आहे. राजीव माझा जुना मित्र आहे आणि त्याने मला चांगली भूमिका दिली. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”

अरुण बक्षी यांनी निर्मात्यांचे कौतुक करताना सांगितले, “मीही लुधियानाचा असल्याने एक वेगळाच आपलेपणा वाटला. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप आनंददायी होता.” या चित्रपटात बृज गोपाल, राजू खेर, गरिमा अग्रवाल, अंजली गुप्ता आणि दिव्या द्विवेदी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संगीतकार विष्णू नारायण आणि गायिका पामेला जैन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘दिल दिवाना हो गया’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *