‘खालिद के शिवाजी’ आता ओटीटीवर

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या विचारांनी आणि जीवनमूल्यांनी आजही लाखो लोकांना योग्य दिशा दिली आहे. याच विचारांना एका वेगळ्या आणि संवेदनशील कथेतून मांडणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवल्यानंतर आता Apple TV OTT, Book My Show OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे.

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे यांच्या प्रभावी भूमिका असून, खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने अत्यंत सहजतेने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मोरे यांनी केले असून लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.

दिग्दर्शक राज मोरे म्हणाले, “हा माझा पहिला मराठी चित्रपट असून, या चित्रपटासाठी मी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आज हा चित्रपट जगभर प्रदर्शित होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. अकोल्यातील नागरिकांनी चित्रीकरणादरम्यान दिलेले प्रेम आणि सहकार्यही माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.”

ही एका निरागस मुलाची खालिदची कथा आहे. समाजव्यवस्थेतील दोषपूर्ण रचनेचा तो नकळत बळी ठरतो. या व्यवस्थेतून स्वतःला मुक्त करण्याचा तो प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या समोर जात, धर्म, लिंग, पंथ, वंश आणि अशा अनेक सामाजिक भेदभावांचे कटू वास्तव उलगडत जाते.एका लहान मुलाच्या नजरेतून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समाजात आजही खोलवर रुजलेल्या अन्यायकारक आणि विषारी व्यवस्थेचे शुद्धीकरण व्हावे, समानता, मानवता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या कथेचा प्रामाणिक उद्देश असल्याचे दिग्दर्शक राज प्रितम मोरे सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *