वेबसीरीज : महारानी ४
कलाकार : हुमा कुरैशी, कनी कुसरुती, विपिन शर्मा, विनीत कुमार, प्रमोद पाठक, शार्दुल भारद्वाज, श्वेता बसु प्रसाद.
दिग्दर्शक : पुनीत प्रकाश
ओटीटी : सोनी लिव
दर्जा : ३ स्टार
राजकीय ड्रामा असेल तर प्रेक्षक त्यात गुंतून जातात, असा आजवरचा अनुभव आहे. सोनी लिव या ओटाटीवरील ‘महारानी-४’ या वेबसीरिजबाबतही हेच सांगता येईल. त्यात दिग्दर्शक पुनीत प्रकाश यांनी पहिल्या सीझनपासूनच ही सीरिज प्रचंड संघर्षमय बनवली आहे. यामुळेच प्रेक्षकांच्या मनात या सीरिजने घरच केलंय. एक अशिक्षित गृहिणी रानी भारती, थेट त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत कशी पोहोचते हा सत्तासंघर्ष या सीरिजमध्ये अप्रतिम दाखवला आहे. याच सीरिजचा चौथा सीझन नुकताच दाखल झाला आहे. नवा सीझन आधीपेक्षा जास्त दमदार आहे हे नक्की.

कथा काय…
आतापर्यंत कथानक बिहार राज्य आणि तेथील राजकारणावर बेतले होते. आता चौथ्या सीझनमध्ये कथेने थेट देशाच्या राजधानी नवी दिल्लीत शिरकाव केलाय. कारण रानी भारतीने आता केवळ बिहारच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या केंद्राच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे. यात सत्तासंघर्ष, राजकीय डावपेच आणि पावलोपावली धोका मिळण्याच्या शक्यता असूनही रानी भारतीला आपली तत्वे, सिद्धांत या बळावर आत्मसन्मानासाठी लढा द्यावा लागतोय. यावेळी सत्तेचा खेळ राज्यातच नव्हे, तर केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे.
अभिनयाचं काय…
हुमा कुरैशी हिने रानी भारती या रुपात पुन्हा एकदा खणखणीत परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाले आहे. प्रतिस्पर्धी म्हणून अमित सियाल दमदार झाला आहे. त्यामुळे कथानक चुरचुरीत व्हायला मदतच झाली आहे. शिवाय जोडीला कनी कुसरुती, विपिन शर्मा आणि विनीत कुमार आहेतच. त्यांनीही आपल्या भूमिकांनी या दोघांना चांगलीच साथ दिली आहे. या सीझनमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या श्वेता बसू प्रसाद हिची भूमिकाही सीरिजमध्ये उत्साहपूर्ण झाली आहे.

तांत्रिक दृष्टीने…
सुभाष कपूर यांचे छोटेछोटे, पण प्रभावी संवाद या सीरिजची जान ठरले आहेत. कधी व्यंगात्मक, तर कधी मिरचीसारखे झणझणीत संवाद परफेक्ट आहेत. कथानक बिहारच्या राजकारणापासून दिल्लीतल्या केंद्रापर्यंत वळवणं सोपं नाही. पण ते दिव्य दिग्दर्शक पुनीत प्रकाश यांनी लीलया पेललंय. हा प्रवास त्यांनी समर्थपणे दाखवला आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये गूढता आणि संवेदनशीलता दिग्दर्शक पुनीत प्रकाश यांनी कायम राखली आहे. या सगळ्याला सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिकने कमालीची साथ दिली आहे. यामुळे वातावरण अक्षरश: सरळ मनात घर करते.
एकूण काय…
एकूणच म्हणायचं तर ‘महारानी-4’ ही वेबसीरिज खऱ्या अर्थाने प्रभावशाली पॉलिटीकल ड्रामा आहे असं म्हणता येऊ शकेल. यातला सत्तासंघर्ष आणि प्रत्येक चाल पटू शकते. एका सर्वसामान्य स्त्रीची आपली तत्वे, धोरणे न सोडता केंद्रात प्रभाव पाडण्यासाठी चाललेली धडपड या सीझनमध्येही छान दाखवली आहे हे नमूद करावंच लागेल. एकूणच राजकीय ड्रामा आणि एका मानभावी स्त्रीचा संघर्ष पाहायचा असेल तर ही वेबसीरिज आवर्जून पाहावी लागेल.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
