मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’

अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर प्रथमच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एक आगळेवेगळे नाटक घेऊन येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे नाटक लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आतापर्यंत भरत दाभोळकर यांनी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांसारख्या दिग्गज मराठी लेखकांची नाटकं इंग्रजीत नेली आणि ती गाजवली. अनेकदा हलके-फुलके विषय घेऊन स्वतः दाभोळकरांनीही आपल्या लेखन-दिग्दर्शनाने हिन्दी, इंग्रजी, गुजराती प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळीही ते स्वतःचं मूळ इंग्रजी नाटक मराठीत घेऊन येत आहेत. यापूर्वी इंग्रजीत हे नाटक विजू खोटे, किशोर प्रधान, विहंग नायक, वृषाली गोखले, अतुल परचुरे, अतुल काळे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हे नाटक अजरामर केले होते. आता हेच नाटक मराठीत आणण्याचे धाडस निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे.

मूळ इंग्रजी नाटकात एक गुजराती कुटुंब दाखवण्यात आले होते, मात्र मराठी प्रेक्षकांची नस ओळखून लेखनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नाटकाचा मूळ गाभा तोच ठेवून संपूर्ण नाटक आता ‘मराठमोळ्या’ पद्धतीने सादर होणार आहे. भरत दाभोळकर म्हणतात, “मराठीत आतापर्यंत विनोद, सस्पेन्स आणि ऐतिहासिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. इंटरनेटमुळे आजच्या पिढीला जगभरातील गोष्टी ठाऊक आहेत. अशातच एखादं मराठमोळं कुटुंब जेव्हा पाकिस्तानात जातं, तेव्हा तिथे उडणारी त्यांची धांदल आणि तो ‘अॅडव्हेंचरस’ प्रवास पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

सध्या मराठी नाटकांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. भरत दाभोळकर यांच्या मते, “जेव्हा मराठी माणूस ओटीटीवरील साचेबद्ध कंटेट पाहून कंटाळतो, तेव्हा तो ताज्या दमाच्या अनुभवासाठी नाटकाकडे वळतो. म्हणूनच ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ सारखा हलका-फुलका आणि साहसी विषय प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *