प्रेमाची फिल्मी कहाणी…

चंदेरी दुनियेचं आकर्षण, सोन्याच्या पडद्याची जादू… याला भुरळ पडत नाही असा कोणीच नाही. आजवर अनेक प्रेमकथा पाहिल्या आपण, पण ही प्रेमकथा आहे थोडी वेगळी, कारण ही आहे अशा दोन व्यक्तींची कथा, ज्यांच्या आयुष्यात प्रेमापेक्षा स्वाभिमान आणि अहंकार आधी येतात. मनोरंजन सृष्टीचा झगमगाट, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा दिमाख… या सगळ्यांच्या मागे दडलेला संघर्ष, स्वप्नं आणि भावनांचा गुंता आणि त्यातून उलगडणारी आरके आणि मोहिनीची प्रेमकथा, नवी मालिका ‘मोहिनी : प्रेमाची फिल्मी कहाणी’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

फिल्मी सेटवर जन्मलेली एक साधी मुलगी आणि त्याच जगावर राज्य करणारा सुपरस्टार… नियती, अहंकार आणि स्वाभिमान यांच्या संघर्षातून उभी राहणारी ही कथा प्रेक्षकांना एका भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. जगण्याने मोहिनीला खूप काही शिकवलं आहे. ती एक लढवय्यी, संकटांना सामोरं जाणारी, बहुआयामी आणि अत्यंत स्ट्रीट-स्मार्ट स्त्री आहे. पडद्यामागच्या जगात वाढलेली ही मुलगी स्वतःच्या बळावर जगाला सामोरी जाते. जगण्यासाठी सुरू झालेला तिचा प्रवास पुढे जाऊन ताकद, प्रेम आणि स्वतःचं स्थान शोधण्याच्या प्रवासात बदलतो. मोहिनीचं एकच ध्येय आहे स्वतःचं आयुष्य सन्मानाने उभं करणं आणि तिच्या आईचा हरवलेला सन्मान व गौरव पुन्हा मिळवणं. आता मोहिनी हे सगळं कसं मिळवणार? कुठली संकटं तिच्या वाट्याला येणार? हे हळूहळू उलगडणार आहे.

मालिकेत कलाकारांची भक्कम फळी पाहायला मिळणार आहे. शालिनी (सोनाली पंडित-नाईक), महेंद्र (शंतनू मोघे), ललिता (श्वेता मेहेंदळे), आरके (समीर परांजपे), मोहिनी (अनघा ठाकूर) आणि प्रताप (सुशील विश्वकर्मा) या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोहिनी : प्रेमाची फिल्मी कहाणी’ ही नवी मालिका २३ मार्चपासून कलर्स मराठीवर पाहायला मिळत आहे.

या मालिकेची कथा मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेल्या मोहिनीभोवती फिरते. तिची आई शालिनी ही एका भीषण परिस्थितीतून स्वतःला, मोहिनीला आणि तिच्या होणाऱ्या मुलाला वाचवून आलेली स्त्री आहे. तर महेंद्र हा फिल्म इंडस्ट्रीतील ॲक्शन डायरेक्टर ज्याने शालिनीला आणि तिच्या मुलींना जपलं. अभिनेत्री सोनाली पंडित-नाईक या मालिकेद्वारे मराठी मालिकांमध्ये १० वर्षांनी पुनरागमन करत आहेत.

महेंद्र, मोहिनी आणि कार्तिकीला स्वतःच्या नावाने वाढवतो आणि त्यांच्यासाठी आधार बनतो. लाईट्स, कॅमेरे आणि मेकअप रूम्समध्ये वाढलेली मोहिनी पुढे जाऊन मेकअप आर्टिस्ट बनते. पण तिच्या आयुष्यात एक मोठं वळण येतं जेव्हा तिची भेट होते हार्टथ्रोब, अहंकारी आणि लोकप्रिय सुपरस्टार आरके (समीर परांजपे) याच्याशी.

देशभरात चाहत्यांचा लाडका असलेला आरके बाहेरून जितका शक्तिशाली आणि आत्मविश्वासी दिसतो, तितक्याच खोल जखमा त्याच्या भूतकाळात दडलेल्या आहेत. मोहिनी सन्मान शोधते, तर आरके हा इगोइस्टीक आहे. त्यांच्या पहिल्या भेटीतच संघर्ष निर्माण होतो आणि त्यातून सुरू होतं एक गुंतागुंतीचं नातं जे अहंकारातून सुरू होतं, सूडातून पुढे जातं आणि शेवटी भावनांच्या वेगळ्याच वळणावर पोहोचतं. नक्की कशी असेल फुलात जाईल हि प्रेमकथा? काय घडेल पुढे? बघूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *