अनुप्रियाचा अभिमान वाटतो… – दीप्ती केतकर

‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, एका स्त्रीची तिच्या संसार आणि स्वप्नांमधील कसरत या मालिकेत दाखवण्यात आली आहे. मालिकेत अनुप्रियाचं रेडिओ जॉकी होण्याचं स्वप्न लग्नानंतर अपूर्ण राहिलं होतं. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही तिच्या मनातलं हे स्वप्न मात्र जिवंतच राहिलं. आता मात्र अनुप्रिया तिच्या स्वप्नांच्या दिशेने धाडसी पाऊल टाकताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते. या संवादामध्ये ती तिचा अनुभव शेअर करताना दिसत आहे आणि रेडिओमार्फत हे सगळं तिचे कुटुंबीय ऐकतात. अनुप्रियाने घरात खोटं सांगून हा निर्णय घेतलेला असल्यामुळे अविनाशला याचा प्रचंड राग येतो. आता अविनाश अनुप्रियाला कोणती शिक्षा देईल? अनुप्रिया या अडचणींचा सामना कसा करेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे. हा विशेष भाग १७ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता सन मराठीवर पाहायला मिळेल. 

मालिकेत अनुप्रिया हे पात्र साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली, “आयुष्यात प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींची अपूर्णच राहतात. विशेषतः लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं आणि अनेकदा तिची स्वप्नं मागे पडतात. अशीच गोष्ट अनुप्रियाची आहे. रेडिओ जॉकी होणं हे तिचं मोठं स्वप्न होतं. पण लग्नानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे ते अपूर्ण राहिलं. मात्र आता तिच्या मुलीमुळे ती पुन्हा नव्याने तिच्या स्वप्नांच्या दिशेने पावलं टाकताना दिसते. अनुप्रिया म्हणून रेडिओमधील अनुभव माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय होता. आजही अनेक महिला अनुप्रियासारखंच आयुष्य जगत आहेत. त्यामुळे स्त्रीचं आयुष्य केवळ संसारापुरतं मर्यादित नसून तिची स्वतःची स्वप्नंही असू शकतात, हा महत्त्वाचा विचार या भागातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.”

पुढे दीप्ती म्हणते, “दीप्ती केतकर म्हणून मला अनुप्रियाचा खूप अभिमान वाटतो, कारण ती आता स्वतःसाठी जगायला शिकते आहे. खरं सांगायचं तर मला कोरिओग्राफीमध्ये करिअर करायचं होतं, पण नकळत मी अभिनय क्षेत्राकडे वळले. पहिल्यांदा ‘कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन’ हे शब्द ऐकले तेव्हा मलाही खूप भीती वाटली होती. कारण तेव्हा मी फक्त १२ वर्षांची होते. माझ्या मते, आपण जे काम करतो त्यात समाधान मिळणं सर्वात महत्त्वाचं असतं. आजही शूटिंग करून घरी जाताना मी माझ्या कामाबद्दल विचार करते. माझी स्पर्धा इतर कोणाशी नसून स्वतःशीच आहे, त्यामुळे ही भूमिका अजून कशी चांगली करता येईल याचाच मी सतत विचार करत असते. स्वप्नं पाहा ती नक्की पूर्ण होतात आणि प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पाठिंबा द्यायलाच हवा, हा संदेश मी सर्वांना देऊ इच्छिते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *