झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ‘जिगिशा’ ही रंगतदार आणि बहुरंगी व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. Gen Z विचारसरणी, महत्त्वाकांक्षा आणि विविध छटांनी सजलेली जिगिशा ही व्यक्तिरेखा आहे. या भूमिकेमुळे प्रेक्षकांना तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचीही झलक पाहायला मिळेल, असे अनुष्का सांगते. या नव्या भूमिकेबद्दल, तिची तयारी आणि ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रवासाविषयी अनुष्काने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

“माझ्या व्यक्तिरेखेचं नाव जिगिशा आहे. ती एकदम Gen Z मुलगी आहे. जिगिशाची आई आणि मातोश्री या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे जिगिशाच्या आईने तिचं लग्न मातोश्रींचा मुलगा, म्हणजे शंकरसोबत ठरवलं आहे. तिने जिगिशाला अगदी स्पष्ट सांगितलं आहे की शंकरशी पैशांसाठी लग्न करायचं आहे. शंकर हा मातोश्रींच्या शब्दाबाहेर नाही, हे जिगिशाला माहिती आहे. त्यामुळे ती सतत मातोश्रींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. पण जिगिशा या व्यक्तिरेखेची गंमत अशी आहे की तिच्या अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. मातोश्री आजूबाजूला नसतात तेव्हा ती पूर्णपणे स्वतःसारखी असते. शंकरसोबत तिचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि तिची आईसोबत ती अगदी खरी जिगिशा असते. मला वैयक्तिकरित्या या तीन वेगवेगळ्या छटा साकारायला खूप मजा येत आहे.

खरं तर या भूमिकेसाठी माझी निवड होण्यामागेही एक छोटीशी गोष्ट आहे. जेव्हा मला या शोसाठी प्रोडक्शनकडून फोन आला, तेव्हा मी आधीच एका प्रोजेक्टचा भाग होते आणि मी एक चित्रपटही साइन केला होता. योगायोग असा झाला की त्यांनी ज्या महिन्यात शोचं शूटिंग सुरू होणार असल्याचं सांगितलं, त्याच महिन्यात माझ्या चित्रपटाचंही शूटिंग होतं. चित्रपट मी आधीच साइन केला होता, त्यामुळे माझी पहिली जबाबदारी तिकडे होती. पण मला हा ‘कृष्णाईच्या लेकी’ शोही करायचा होता. कारण मला ही व्यक्तिरेखा खूप आवडली होती. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तारखांच्या अडचणीमुळे कदाचित मला हा शो करता येणार नाही. त्यामुळे मी थोडी नाराज झाले होते. पण चॅनेल आणि प्रोडक्शन टीमने माझ्या तारखा इतक्या छान पद्धतीने जुळवून घेतल्या की मला चित्रपटाचं शूटिंगही करता आलं आणि त्यानंतर या शोचाही भाग होता आलं.

जेव्हा मला या शोबद्दल आणि माझ्या व्यक्तिरेखेबद्दल, म्हणजे जिगिशाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मला थोडं आश्चर्यही वाटलं आणि खूप आनंदही झाला. कारण दिग्दर्शक आणि क्रिएटिव्ह टीम मला आधीपासून ओळखत होती. साधारण वर्षभरापूर्वी आम्ही एका दुसऱ्या प्रोजेक्टसाठी भेटलो होतो. त्यांनी मला जिगिशासाठी फक्त एकच ब्रीफ दिलं, “तू जशी आहेस, तसंच हे पात्र साकारायचं.” त्यामुळे मला हा रोल करताना खूप मजा येते आहे. या व्यक्तिरेखेमुळे मला माझ्या खऱ्या स्वभावाचा एक भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येत आहे.

मला निवेदिता ताईंसोबत खूप आधीपासून काम करायचं होतं. एक अभिनेत्री म्हणून तर त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंच, पण एक माणूस म्हणूनही त्या खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. त्या रोज आमच्यासाठी काही ना काही खायला घेऊन येतात. त्या फक्त पडद्यावर आईची भूमिका करत नाहीत, तर सेटवरही आमची तितकीच काळजी घेतात. माझ्या आईची भूमिका करणाऱ्या नंदिनी ताईंबद्दलही मी हेच म्हणेन. त्या स्वतःसाठी जे आणतात, ते माझ्यासाठीही घेऊन येतात. सेटवर सगळे आम्हाला म्हणतात, “तुमच्या दोघींची कास्टिंग अगदी परफेक्ट आहे. खरंच आई-मुलगी वाटता.”
प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की ‘कृष्णाईच्या लेकी’ या आमच्या मालिकेला भरभरून प्रेम द्या. माझ्या जिगिशा या व्यक्तिरेखेलाही तितकंच प्रेम द्या. अनेक मनोरंजक वळणं आणि नवीन घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
