नियमित फिटनेसमुळे खूप मदत झाली – मानसी कुलकर्णी

झी मराठीवरील ‘तारिणी’ या मालिकेत जया जगदाळे अर्थात जे.जे. (कमिशनर ऑफ पोलीस) यांची एंट्री होणार आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने ‘तारिणी’च्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव आणि या भूमिकेतील आव्हानांविषयी सांगितले.

मानसी म्हणाली, “पहिला दिवस माझा चाचपडत गेला. कारण या मालिकेतील बाकीचे कलाकार जवळपास वर्षभरापासून एकत्र काम करत आहेत. त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखेची, आणि बोलण्याच्या शैलीची पूर्ण जाण होती. माझी व्यक्तिरेखा नव्याने सुरू होत असल्यामुळे, माझ्या मनात एका कडक, सरळ आणि ठाम पोलिस अधिकाऱ्याची प्रतिमा होती. पण सेटवर आल्यानंतर लक्षात आलं की ही व्यक्तिरेखा त्यापेक्षा खूप वेगळी आहे. आमचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी ही भूमिका समजून घेण्यासाठी आणि साकारण्यासाठी मला खूप मदत केली. जे.जे. ही पोलिस अधिकारी असली तरी तिची बोलण्याची पद्धत, देहबोली आणि वागणं हे नेहमीच्या पोलिस अधिकाऱ्यांपेक्षा वेगळं आहे. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या व्यक्तिरेखेचं श्रेय मी लेखक आणि दिग्दर्शकांना देईन.”

भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना ती म्हणाली, “ही भूमिका मला अचानक मिळाली, त्यामुळे तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही. पण मी नियमित व्यायाम करते, फिटनेसकडे लक्ष देते, त्यामुळे त्याचा या भूमिकेत नक्कीच उपयोग झाला. यापूर्वीही मी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली असल्याने पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये सहज वावरता आलं. जे.जे. ही खूप गोड व्यक्तिरेखा आहे. पण प्रेक्षकांना जे अपेक्षित वाटत असेल, त्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यांना पाहायला मिळेल. झी मराठी नेहमीच वेगळं आणि मनोरंजक सादर करतं, त्याचप्रमाणे जे.जे. या नव्या व्यक्तिरेखेमुळेही प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.”

जे.जे.च्या आगमनानंतर तारिणीच्या तपासात कोणते नवे प्रश्न उभे राहतील ? तारिणी आणि जे.जे. एकमेकांसोबत कसे काम करतील ? आणि गुलाबच्या तपासाचं पुढे काय होणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *