वारीत अविरत चालणारी मंडळी आणि विठ्ठल माऊलीचे सेवाकरी आणि त्यांच्या सोबतीने कधीतरी आपणही वारी करावी अशी अनेकांची इच्छा असते. यंदाच्या वारीत अभिनेत्री अक्षया नाईक हिची हीच इच्छा माऊलीच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. अक्षयाने तिच्या याच पहिल्यावहिल्या वारीचा अनुभव शेयर केला.

ती म्हणते, “वारीबद्दल कायम मनात एक उत्सुकता होती कधीतरी आपण सुद्धा असंच बाकी वारकरी मंडळीसोबत वारी अनुभवू शकू का? हा प्रश्न कायम मनात होता आणि यंदा अचानक का होईना पण पांडुरंगाचं बोलवणं हे आल आणि मी माझ्या आयुष्यातली पहिलीवहिली वारी अनुभवली. वारीत चालणारी मंडळी बघून त्यांचामध्ये एवढी ऊर्जा कशी येत असावी हे वारीत जाऊन अनुभवता आले. हा समृद्धसंपन्न अनुभव शब्दांत मांडूच शकत नाही. कारण असं म्हणतात, वारी ही अनुभवावी लागते आणि हा प्रत्यय वारी करून आला. टाळ मृदुगांचा गजर, हरिनामाचा जप आणि वारी मधला उत्साह हा शब्दाच्या पलीकडचा आहे. वारीत जाऊन मला विठ्ठल रुख्मिणी रुपी आलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचीही संधी मिळाली आणि माझी वारी सुफळ संपूर्ण झाली.”

अनेक कलाकार मंडळी सध्या वारीला जाताना दिसतात. प्रत्येकाच्या नशिबी आलेली वारी ही सारखी नसली, तरी ती वेगळा पण अद्भुत अनुभव देणारी मात्र नक्कीच असते हे नक्की.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
