अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे विश्वविक्रमी बालनाट्य १००० प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या या नाटकाने आजवर बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही भुरळ घातली आहे.

या नाटकाने ३६५ दिवसांत ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम केला आहे. तसेच एका दिवसात चार, पाच आणि एकाच टीमने सहा प्रयोग सादर करण्याची नोंदही या नाटकाच्या प्रवासात झाली आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा विशेष टप्पा मानला जात आहे. या नाटकाच्या माध्यमातून बालप्रेक्षकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि मराठी भाषेच्या संस्कारांना हातभार लागतो. नाटकातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत तसेच बालकलाकारांनी आवाज दिला आहे. ही गाणी आता बालप्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहेत. १००० प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’च्या या प्रवासात गीतांच्या अनावरणामुळे आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
