‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

रंगभूमीवर काही नाटकं अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे असंच एक गाजलेलं आणि आवडतं नाटक आता पुन्हा एकदा रंगभूमीवर परतत आहे. काही काळ विश्रांतीनंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होत आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या नेटक्या दिग्दर्शनातून आणि लेखक श्रीनिवास भणगे यांच्या खुसखुशीत लेखणीतून उभं राहिलेलं हे नाटक प्रेक्षकांना पोट धरून हसवतानाच जीवनातील नातेसंबंधांवरही भाष्य करतं. संगीतकार अजित परब यांच्या सुरांनी नाटकात अधिकच रंगत आणली आहे. यात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबीक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

दिग्दर्शक विजय केंकरे म्हणतात, रंगभूमी ही जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.

एकूणच, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यरसिकांना कुटुंबासोबत हलकंफुलकं आणि दर्जेदार मनोरंजन अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *