मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेबसिरीज ‘पौर्णिमेचा फेरा’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता ‘पौर्णिमेचा फेरा’चा तिसरा सीझन आला आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्स या यूट्युब चॅनेलवर या वेबसिरीजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीजला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणाऱ्या ‘पौर्णिमेचा फेरा-३’मध्ये हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे यांची साथ लाभली आहे.

या वेब सिरीजचे दिग्दर्शन सचिन गोताड यांनी केले आहे. कथा, संवाद आणि पटकथा संदेश लोकेगावकर यांची असून, छायाचित्रण कुणाल महादेव परडकर यांनी केले आहे. अनिरुद्ध निमकर याने संगीत दिले आहे.

‘पौर्णिमेचा फेरा’ या वेबसिरीजची मांडणी इतर कथांपेक्षा वेगळी असल्यानेच ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. पहिल्या सीझनमध्ये तीन मित्रांच्या गावी जाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका खोल रहस्यात जाऊन अडकला. एका मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरू झालेला हा खेळ दुसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक झाला. आता, जिथे दुसरा सीझन संपला, तिथूनच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी सीझन-३ सज्ज झाला आहे.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
