‘कमळी’ मालिकेत अनामिका

कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळण, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार यामुळे झी मराठीवरील ‘कमळी’ ही मालिका आणखी उत्कंठावर्धक बनली आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतानाच, आता मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत एन्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

याबाबत बोलताना आर्या आंबेकर म्हणाली, “एका कॉलेजमधील म्युझिक टीचर, म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारण्यात आलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते, विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना. त्यामुळे मला ही भूमिका आवडली आणि मी होकार दिला. झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथंच घडले. मी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे, इथेच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तसेच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत आणि प्रेमगीतं गायली आहेत. त्यामुळे झी मराठी मला घरासारखं वाटतं. म्हणून ही संधी स्वीकारणं माझ्यासाठी खूप सोपं होतं.

आपल्या भूमिकेबद्दल ती म्हणते, ‘माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘अनामिका’ आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे, पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी व ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे, असेही तिने स्पष्ट केले.

ती पुढे सांगते, कमळीच्या टीमसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. संपूर्ण प्रॉडक्शन टीम नियोजनबद्ध काम करतेय आणि कलाकारांची पूर्ण काळजी घेतली जाते. सेटवरील वातावरण खूप सकारात्मक असतं, दिग्दर्शक, क्रिएटिव्ह टीम आणि प्रोडक्शन टीम सगळेच उत्कृष्ट आहेत. माझ्या व्यक्तिरेखेत गाण्यालाही महत्त्व होतं. मी या खास भागांमध्ये काही गाणीही गायली आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *