नाटकानंतर आता चित्रपटात…

चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलेला अभिनेता ओमकार गोवर्धन आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. “बाज्या बैज्या” असे अनोखे नाव असलेल्या चित्रपटातून तो आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर करणार असून संगीत आणि पार्श्वसंगीत समाधान ऐवळे हे करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित असलेल्या “फुला” चित्रपटातून अभिषेक जावीर आणि समाधान ऐवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. “फुला” चित्रपटाच्या यशानंतर अभिषेक आणि समाधान हे पुन्हा एकदा जोमाने या चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणदेशात घडलेल्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. कुकुडवाड मायणी या भागामध्ये प्रसिद्ध असणारे दोन नरवीर बाज्या आणि बैजा यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. तिच्या समोर हे दोन्ही नरवीर गोफण नेमबाजी करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गोरगरीब आणि शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या विरोधात बंड केले होते. सशस्त्र इंग्रजा विरुद्ध त्यांनी आपल्या माणदेशी दुर्गम भागाचा वापर करून लढा उभारला होता. बंदूकधारी इंग्रज सैनिकांचे या दोन्ही नरवीरांनी आपल्या गोफनीने कित्येक वेळा डोके फोडले होते. गावगाड्यातील जुलमी सावकार यांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. अशा थरारक आणि साहसी ऐतिहासिक घटनेवर या चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचे दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले.

अभिनेता ओमकार गोवर्धन सोबत आजवर मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अश्विनी कासार यात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. “फुला” चित्रपटात मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम, सृष्टी जाधव, उमेश बोलके यांचाही अभिनय या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गीतांसाठी वेगळा बाज वापरणार असल्याचे संगीतकार समाधान ऐवळे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *