सासूृृ-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता “कप-बशी” या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीत दिलं आहे. बाळू दहिफळे कॅमेरामन असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे.

अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सुनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचे पुढे लग्न जुळत की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर “कप बशी” हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित होतोय.

लेखक – श्री. नितिन फणसे सर
डिजिटल क्रिएटर – नाट्य, मालिका आणि चित्रपट समीक्षक
