दीप्ती केतकर आता थांबणार नाही…

प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते, पण आता मी थांबणार नाही… असं सांगत अभिनेत्री दीप्ती केतकर जोमाने कामाला लागली आहे. या मालिकेसाठी तिच्या सासूबाई, नवरा व मुलगी तिच्यापेक्षा जास्त खुश आहेत. तिच्या सासूबाईंनीही तिला ठणकावून सांगितलंय की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे, आमची काळजी करू नकोस. दीप्ती सन मराठी वाहिनीवर लवकरच ‘मी संसार माझा रेखिते’ या कौटुंबिक मालिकेत केंद्रीय भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात दीप्तीने अनुप्रियाची प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीच आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी ही अनुप्रिया १ डिसेंबरपासून रोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना भेटणार आहे.

मुख्य अभिनेत्री दीप्ती केतकरसह, हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे मालिकेची रंगत वाढवतील. मालिकेचा विषय प्रत्येक गृहिणीला आपलंसं करून घेणारा आहे. याचसह मालिकेत मायलेकीचं घट्ट नातं पाहायला मिळतंय. ‘जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं’ या सुंदर तत्त्वावर मालिका आधारलेली आहे.

मालिकेत अनुप्रिया ही मुख्य भूमिका साकारण्याबद्दल दीप्ती म्हणाली, या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काहीकाळ मी अशाच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्न बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये, असे तिने सांगितले.

ती पुढे म्हणाली, माझ्यासाठी मुलीकडून “आई तू खूप छान काम करतेस” हे वाक्य ऐकणं कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठं आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्यामागे खंबीर उभी असते. याबरोबरच आमची टीम खूप जबरदस्त आहे. त्यामुळे काम करायला मज्जा येईल. हळूहळू अनुप्रियाच्या प्रत्येक छटा मला जाणून घ्यायच्या आहेत. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम व आशीर्वाद द्या, असेही तिने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *